अमरावती : जिल्ह्यात फेब्रुवारीपासून कोरोनाची रुग्णसंख्या वाढायला लागली. या १०० दिवसांत ५१ हजार कोरोनाग्रस्त अन् ८०० मृत्यूची नोंद झाल्यानंतरही संक्रंमितांची रोज उच्चांकी नोंद होत आहे. आता तर ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झालेला असल्याने संसर्ग कधी कमी होणार, याविषयी तज्ज्ञांमध्ये एकमत नाही. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट तर नव्हे, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात साधारणपणे २८ जानेवारीपासून सुरू झाली. किंबहुना राज्यात कोरोनाची दुसरी लाट ही अमरावती जिल्ह्यापासून झाल्याचे बोलले जात आहे. तेव्हापासून कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढताच आहे. ८ मे रोजी झालेली १,२४१ नव्या पाॅझिटिव्ह नोंद ही आतापर्यंतचा उच्चांक असल्याने, दुसऱ्या लाटेच्या १०० दिवसांनंतरही कोरोनाचा आलेख वाढताच आहे.
कोरोनाची साखळी खंडित व्हावी, यासाठी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी मार्च महिन्यात दोन वेळा संचारबंदी लागू केली. लॉकडाऊननंतर राज्यातील पहिले मिनी लॉकडाऊन अमरावती जिल्ह्यात झाले. याकाळात जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढायला लागल्याने पुणे येथील एनआयव्हीमध्ये सात नमुने तपासणीसाठी पाठविले असता चार नमुन्यांमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन असल्याची नोंद झाली. यानंतर चार वर्गवारीमधील प्रत्येकी २५ नमुने तपासणीसाठी पाठविले असता ७० टक्के नमुन्यांमध्ये कोरोनाचा ‘डबल म्युटंट व्हेरियंट’ची नोंद झाल्याचे सांगण्यात आले. याशिवाय लगतच्या नागपूर, वर्धा, मध्यप्रदेश येथील रुग्ण मोठ्या संख्येने जिल्ह्यात उपचारार्थ दाखल झाले व जिल्ह्यात पुन्हा कोरोना संसर्गाचा ग्राफ वाढायला लागला आहे. शासनाने एक महिन्यांची संचारबंदी लागू केली असतानाही कोरोनाचा संसर्ग वाढताच असल्याने जिल्ह्याधिकाऱ्यांनी आता १५ मे पर्यंत लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे ही तिसऱ्या लाटेची नांदी तर नव्हे, अशी शंका नागरिक उपस्थित करू लागले आहे.
पाईंटर
असा वाढला कोरोना
महिना पॉझिटिव्ह मृत्यू
फेब्रुवारी १३,२३० ९२
मार्च १३,५१८ १६४
एप्रिल १६,६९४ ४१०
८ मे ७,५५२ १३३
बॉक्स
शहरात ‘हर्ड इम्युडिटी’?
कोरोना संसर्गाचे वर्षभरात महापालिका क्षेत्रात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची नोंद झालेली आहे. मात्र, या महिनाभरात अचानक ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढायला लागला आहे. विशेष म्हणजे शहराच्या ज्या भागात यापूर्वी संसर्ग वाढला त्या भागात नव्यानेे संक्रमितांची नोंद झालेली झाली. त्यामुळे शहरात आता सामूहिक रोग प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युडिटी) विकसित झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
बॉक्स
ग्रामीणमध्ये का वाढला कोरोना?
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे सुरुवातीच्या काळात ग्रामीण भागातील ग्राम सुरक्षा समिती कमालीच्या ॲक्टिव्ह होत्या. त्यावेळी गावात कुणी अन्य जिल्ह्यातील व्यक्ती आला तर त्याला व्कारंटाईन ठेवले जात असे. आता याकडे समितीचे दुर्लक्ष आहे. मुळात समित्या निक्रिय झाल्या आहेत. त्यानंतर लग्न आदीप्रसंगात शेकडोंचा सहभाग राहत आहे व जिल्हासिमेलगतच्या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढल्याचाही परिणाम झालेला आहे.
कोट
ग्रामीण भागात घरात जागा कमी असणे, लोकांनी एकत्र येऊन गप्पा मारणे, याशिवाय मास्क न वापरणे व लग्नकार्यात गर्दी आदी अनेक कारणांमुळे ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे.
- श्यामसुंदर निकम,
जिल्हा शल्यचिकित्सक
कोट
सुरुवातीला ग्राम सुरक्षा समिती कमालीच्या ॲक्टिव्ह होत्या. आता निष्क्रिय अवस्थेत आहे. याशिवाय ग्रामीण भागात कोणत्याही प्रसंगात गर्दी व त्रिसूत्रीचे पालन नसल्याने संसर्ग वाढला आहे.
- दिलीप रणमले,
जिल्हा आरोग्य अधिकारी