अमरावती : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बदल्यांना यावर्षी ग्रामविकास विभागाने खो दिला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मार्च एप्रिल व मे महिना म्हटला की, जिल्हा परिषद, पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध लागतात. त्यामुळे प्रशासनामार्फत अधिकारी व कर्मचाऱ्यांची बदल्यांसाठी माहिती मागविली जाते. त्यानुसार बदल्यांची कार्यवाही होत असते. मात्र, जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या संदर्भात ग्रामविकास विभागाने १८ मार्च रोजी परिपत्रक काढले. कोरोना संकटाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या विविध विभागांच्या अंतर्गत उपाययोजनांत सातत्य राखणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन चालू आर्थिक वर्षात कोणत्याही संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची बदली करण्यात येऊ नये. सद्यस्थितीत कोरोना संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बदल्या करण्यात येऊ नये, असे म्हटले आहे. हा बदल्या रद्दचा आदेश सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या विविध विभागांत अधिकारी व कर्मचाऱ्यांत बदल्यांवरून चर्चा सुरू होती. यावर्षी तरी बदलांमधून मुक्तता मिळाली असल्याचे कर्मचाऱ्यांमध्ये बोलले जात आहे.
कोट
ग्रामविकास विभागाने १८ मार्च रोजी जारी केलेल्या पत्रानुसार येत्या ३१ मार्चपर्यंत लागू होते. त्यामुळे नवीन आर्थिक वर्षात बदल्यांबाबत शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी होण्याची शक्यता आहे.
- पंकज गुल्हाने,
जिल्हाध्यक्ष, झेडपी कर्मचारी युनियन