तिवसा : तालुक्यातील गुरुदेवनगर, मोझरी, अनकवाडी येथे कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. हे पाहता, गुरुदेवनगर ग्रामपंचायतीचे सचिव रमेश पटके व प्रशासक पुनसे यांनी ९ फेब्रुवारीपासून रुग्ण आढळलेल्या परिसरात फवारणी करण्यास प्रारंभ केला. गावात भरणारा बाजार बंद ठेवण्याचे आदेश बुधवारी देण्यात आले.
गुरुदेवनगर येथे कोरोना आजाराने गेल्या दहा दिवसांपासून थैमान घातले आहे. रुग्णसंख्येत होणारी वाढ पाहता, प्रशासन खडबडून जागे झाले आहे. येथील आठवडी बाजार १५ दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. १६ किराणा दुकानदारांना नियम व अटींचे पालन करण्याबाबत नोटीस दिल्या व महामार्गालगत सायंकाळच्या वेळी उभे राहून गर्दी करणारे पाणीपुरी, भेळ, अंडे व्यवसायिकांना आठ दिवस व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जो नियमाचा उल्लंघन करेल, त्याच्याविरुद्ध कारवाई केली जाणार असल्याचे पत्रकात नमूद आहे. या गंभीर आजाराला आळा घालण्याच्या हेतूने उपाययोजना सुरू असल्याचे ग्रामसेवक रमेश पटके यांनी सांगितले.