मोहन राऊत
धामणगाव रेल्वे (अमरावती) : लहान भाऊ आजारी, आजी-आजोबांची प्रकृती अन् आर्थिक स्थितीही यथातथाच. त्यामुळे घरून पैसे मिळाले नाहीत. अखेर त्यांनी चाकणहून पायीच छत्तीसगढ गाठण्याचा पर्याय निवडला. पाच दिवसांत ५४६ किमी अंतर कापून त्यांनी धामणगाव गाठले. दरम्यान प्रशासनाने ताब्यात घेऊन त्यांची तात्पुरत्या निवाऱ्यात रवानगी केली. आता क्वारंटाइनचा कालावधी येथे काढावा लागणार असल्याने प्रवास थांबला आहे.
लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यातही मजुरांची पायपीट थांबलेली नाही. कुठे कंत्राटदार छळ करीत आहेत, तर कुठे दूर गावात असलेल्या काळजाच्या तुकड्यांची आठवण पायाला भिंगरी लावत आहे. त्यामुळे अनेकांची अखंड पायपीट सुरू आहे. तब्बल ५४६ किलोमीटरची पायपीट करीत १८ मजूर बुधवारी उशिरा रात्री तळेगाव दशासर येथे पोहोचले. यात महिला, लहान मुले व पुरुष मजुरांचा समावेश आहे. छत्तीसगढ राज्यातील हे मजूर चाकण (पुणे) येथे दोन वर्षांपासून कामाला होते. लॉकडाऊननंतर ठेकेदारानेही पाठ फिरवली. त्यामुळे उपाशीपोटी पाच दिवसांचा प्रवास करीत ते तळेगाव दशासर येथे पोहोचले. ठाणेदार रीता उईके यांच्या दृष्टीस पडताच त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची आपबिती ऐकली. त्यांना अन्नाचा घास भरविला. प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. संतोष गोफने यांनी त्यांची आरोग्य तपासणी केली.
मजुरांपैकी अनेकांच्या पायात चप्पल नसल्याने त्यांच्या पायाची चाळण झाली होती. त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर मंडळ अधिकारी प्रकाश बमनोटे यांनी त्यांना धामणगाव येथे वाहनाने आणले. तहसीलदार भगवान कांबळे यांच्यासमोर ओळख परेड झाली. त्यानंतर धामणगाव येथील निवासी आश्रमशाळेत त्यांची व्यवस्था करण्यात आली.
समृद्धीचे कामगारही धामणगावातवाशीम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे समृद्धी महामार्गाच्या कामावर असलेल्या मध्य प्रदेशामधील १०० मजुरांनी कंत्राटदाराने पैसे न दिल्यामुळे उपाशीपोटी तीन दिवस पायपीट करीत गुरुवारी मंगरूळ दस्तगीर गाठले. पोलीस ठाण्याच्या परिसरातून त्यांना जिल्हा सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंता, मंगरूळ दस्तगीर येथील ठाणेदार श्याम वानखडे, मंडळ अधिकारी देविदास उगले यांनी मंगरूळ दस्तगीर व दत्तापूर पोलिसांच्या मदतीने धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक महेश साबळे यांनी या मजुरांची आरोग्य तपासणी केली. त्यानंतर शहरातील भोजन सेवा समितीच्यावतीने त्यांना भोजन देण्यात आले. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी एस.एम. कुलकर्णी यांनी जुना धामणगाव येथे निवासी आश्रमशाळेत असलेल्या मजुरांची गुरुवारी पाहणी केली.
धामणगाव निवारा केंद्रात ११२ परप्रांतीय मजूर आहेत. त्यांची निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. कारंजाहून १०० मजुरांना परत कारंजा येथे पाठविण्यात येणार आहे. संबंधित कंत्राटदाराशी संपर्क साधण्यात येत आहे. - भगवान कांबळे, तहसीलदार, धामणगाव रेल्वे