अमरावती : कोरोनासदृश लक्षणे असणाºया ‘सारी’ (सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी इलनेस) आजाराचा शिरकाव शहरात झालेला आहे. या आजाराचे शहरात आतापर्यंत २२ रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बुधवारी दिली. महापालिकेत या आजारासंदर्भात मंगळवारी झालेल्या आरोग्य अधिकाºयांच्या बैठकीत ‘आयसीएमआर’च्या मार्गदर्शक सूचनेनुसार सारी व कोरोना रोगाची तपासणी व्हावी, यासंदर्भात सूचना देण्यात आल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी विशाल काळे यांनी दिली. राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व रुग्णालयांनी बाह्यरुग्ण व आंतररुग्णांचे ‘सारी’ आजारासंदर्भात सर्वेक्षण करावे, असे निर्देश पुणे येथील राज्य आरोग्य सेवेच्या संचालक अर्चना पाटील यांनी यापूर्वीच जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना दिले आहेत.
ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे आदी या आजाराची लक्षणे आहेत. अशा रुग्णांना १०८ अॅम्ब्यूलन्समधून कोविड -१९ साठी निश्चित केलेल्या १०० व त्यापेक्षा जास्त बेड असलेल्या रुग्णालयात पुढील उपचारासाठी संदर्भित करण्याचे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत.
अमरावती जिल्ह्यात ‘सारी’ आजाराचे २२ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये कुणीही गंभीर नाही. या रुग्णांची नोंद नॉन कोविड सिग्नोमॅटिकमध्ये करण्यात आली आहे. - शैलेश नवाल, जिल्हाधिकारी, अमरावती