लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात सोमवारी १९ मृत्यू झाल्याने मृत कोरोनाग्रस्तांची संख्या १००२ वर पोहोचली आहे. याशिवाय अन्य जिल्ह्यातील दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या १,१३९ वर पोहोचली आहे. सोमवारी पुन्हा ९०३ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आतापर्यंत ६८,४०४ कोरोनाग्रस्तांची नोंद झालेली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना चाचण्यांमध्ये वाढती पॉझिटिव्हिटी चिंतेची बाब ठरत आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालानूसार सोमवारी ३,४०४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये महिनाभरातील उच्चांकी २६.५२ टक्के पॉझिटिव्हिटीची नोंद करण्यात आली. चार दिवसांपासून पॉझिटिव्हिटीचे प्रमाण वाढते असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत भर पडली आहे.
शहराच्या तुलनेत आता ग्रामीणमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण धोक्याचे पातळीवर आहे. एप्रिल महिन्यात ग्रामीण भागात ६१,७६७ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये १०,२९९ अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये १६.६७ टक्के पॉझिटिव्हिटीची नोंद झाली. याव्यतिरिक्त १६३ रुग्णांचे उपचारादरम्यान निधन झाले आहे. ही टक्केवारी १.५८ टक्के आहे.
जिल्ह्यात १९ अन्य जिल्ह्यातील दोन मृत्यू
जिल्ह्यात सोमवारी ६५ वर्षीय पुरुष (शहापूर, अंजनगाव सुर्जी), ८५ वर्षीय पुरुष (यशोदानगर), ४५ वर्षीय पुरुष (तळेगाव दशासर, धामणगाव रेल्वे), ६० वर्षीय पुरुष (धनज), ५६ वर्षीय पुरुष (अमरावती), ५२ वर्षीय महिला (दर्यापूर), ७५ वर्षीय पुरुष (भातकुली), ४७ वर्षीय महिला (परसापूर), ७३ वर्षीय पुरुष (रामनगर, अमरावती), ६६ वर्षीय पुरुष (खडकी, वर्धा), ५३ वर्षीय महिला (तिवसा), ६५ वर्षीय पुरुष (देऊरवाडा, परतवाडा), ७० वर्षीय पुरुष (वरूड), ५० वर्षीय पुरुष (कुऱ्हा), ५४ वर्षीय पुरुष (वरूड), ६५ वर्षीय महिला (पिंपळखुटा), ६५ वर्षीय पुरुष (बेनोडा, वरूड), ६२ वर्षीय पुरुष (नांदगाव खंडेश्वर) व ६५ वर्षीय पुरुष (वडाळी) व अन्य जिल्ह्यातील ४५ वर्षीय महिला (मंगरुळपीर, वाशिम) व ६४ वर्षीय महिला (नागपूर) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.