बडनेरा : गुरांचा बाजार बंद ठेवण्याबाबतचे आदेश असतानादेखील शुक्रवारचा बडनेरचा बाजार भारला. येथे परराज्यातून शेकडोंच्या संख्येत जनावरे विक्रीस येतात. कोरोना आजाराबाबत खरेच बाजार समिती संवेदनशील आहे का, असा सवाल यामुळे उपस्थित झाला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती अंतर्गत बडने-यात दर शुक्रवारी गुरांचा बाजार भरतो. सध्या कोरोनाचा संसर्ग पसरू नये, यासाठी केंद्र राज्य सरकार सर्वतोपरी उपाययोजना करीत आहे. त्यात प्रामुख्याने गर्दीचे ठिकाण फोकसमध्ये आहे. गर्दी टाळा, असे सातत्याने सांगितले जात आहे. मात्र बाजार समितीला याचा विसर पडला.
शुक्रवारी गुरांचा बाजार भरला. शेकडो जनावरे बाजारात पोहोचली. यात दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्टÑ, राजस्थान, गुजरातहून जनावरे विक्रीसाठी आणल्याने खरेदी, विक्रीदारांची मोठी गर्दी होती. एकीकडे कोरोना आजारावर नियंत्रण मिळविण्याचे कार्य शासनस्तरावर सुरू असताना बडने-यात त्याला फाटा दिला जात आहे.
बाजाराच्या माध्यमातून शहरात कोरोनाचा संसर्ग शिरल्यास त्याला बाजार समिती जबाबदार ठरेल, असे शहरवासीयांमध्ये बोलले जात आहे. जिल्ह्याधिकाºयांसह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे गुरांचे बाजार बंद ठेवण्यातबाबत आदेश निर्गमित झाले आहे.
गर्दीच्या प्रवाशांशी थेट संपर्क टाळा कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावतीद्वारा कोरोना विषाणूपासून सावध राहा, गर्दीत प्रवाशांशी थेट संपर्क टाळा, अशा आवाहनाचे फलक बडने-यातील गुरांच्या बाजारात लावणयात आले आहे. त्यांनाच मात्र या फलकावरील संदेशाचा विसर पडल्याचे चित्र आहे.
खरेदी विक्रीदार मास्कविनाच बाजारात शेकडोंच्या संख्येत खरेदी विक्रीदार होते. मात्र, बोटावर मोजण्याइतकेच मास्क लावून होते. लहान मुलांची संख्यादेखील बरीच होती.
मनपा प्रशासनाकडून ऐनवेळी बाजार बंद ठेवण्याचे आदेश मिळाले. बाहेर राज्यातील गुरांची वाहने पोहोचल्या होत्या. पुढील शुक्रवारपासून पुढील आदेशपर्यंत बाजार बंद राहणार आहे. - किरण साबळे, निरीक्षक कृषी उत्पन्न बाजार समिती