अमरावती : कोरोना महामारीविरुद्ध लढणारे जिल्ह्यातील डॉक्टर, परिचारिका, आरोग्यसेवकांना खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते बुधवारी पीपीई किट्सचे वाटप करण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालय, डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात हे किट्स वाटप करण्यात आले.
अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना या महामारीपासून नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्यसेवक अहोरात्र झटत आहेत. खासदार नवनीत राणा, आमदार रवि राणा यांच्या पुढाकाराने पीपीई किट उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उच्च दर्जाच्या या पीपीई किटमध्ये फेस शिल्ड, गॉगल, मास्क, परण, लोवर, सॉक्स असे पूर्ण साहित्य आहे. येथील इर्विन रूग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम, पीडीएमसीचे अधिष्ठाता पद्माकर सोमवंशी यांच्या उपस्थितीत डॉक्टर, परिचारिकांना या किट प्रदान करण्यात आल्यात.
यावेळी डॉ. सतीश हुमने, योगेश गावंडे, डॉ. पारेख, डॉ लोहकपुरे, डॉ. पुंडकर, डॉ.अजय डफळे, डॉ. सुनील लव्हाळे, डॉ. जावरकर, परिचारिका संध्या वाघमारे, चित्रा देशमुख, ज्योती पंडित, मंदा बांबर्डे, युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, अवि काळे, भूषण पाटणे आदी उपस्थित होते. दरम्यान, या अभिनव उपक्रमबाबत डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य सेवकांनी खासदार राणांना मनापासून धन्यवाद मानलेत.
देवदुतांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहू - नवनीत राणारुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे. हे कोरोनाविरूद्धच्या लढ्यातून सिद्ध झाले आहे. देव कोणीही बघितला नाही. मात्र, देव हा माणसातच असून, डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य सेवकांच्या कर्तव्याने पुन्हा त्यावर मोहोर उमटविली आहे. या देवदूतांच्या मदतीसाठी आपण सदैव तत्पर राहू, असा विश्वास खासदार नवनीत राणा यांनी पीपीई किट वाटपप्रसंगी व्यक्त के ला.