अमरावती : बुधवारी जिल्ह्यात ८०२ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ३१,९२५ झाली आहे. तर २४ तासांत उपचारादरम्यान १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात संक्रमितांच्या मृत्यूची संख्या ४८१ झालेली आहे. रुग्णांमागे किमान २० चाचण्या झाल्या पाहिजे, असे निर्देश असतानाही चाचण्यांची संख्या कमी आहे. मंगळवारी २,३६५ चाचण्या करण्यात आल्या. यात ३३.९१ टक्के पॉझिटिव्हिटी राहिली.
पश्चिम वऱ्हाड : सात जणांचा मृत्यू
पश्चिम वऱ्हाडात काेराेनाचा कहर वाढला असून, बुधवारी प्राप्त अहवालात अकाेला, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यातील एकूण १०७१ जण पाॅझिटिव्ह आढळले आहेत. सर्वाधिक रुग्ण अकाेल्यात ३८५ तर बुलडाण्यात ३६८ आणि वाशिमला ३१८ रुग्ण आढळले आहेत. बुलडाणा जिल्ह्यात ४ जणांचा मृत्यू झाला, अकाेला जिल्हात दाेन जणांचा तर वाशिम जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला आहे. अकाेला जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या १४,८०३ वर पोहोचली आहे. बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढले असून, रुग्ण दुपटीचा वेग ३३ दिवसांवर आला आहे.
मराठवाड्यातील विदर्भ सीमेवर चौकी
मराठवाडा आणि विदर्भाची सीमा असलेल्या येलदरी येथील धरण परिसरामध्ये प्रशासनाने नाकाबंदी चौकी उभारली खरी, परंतु याठिकाणी कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने अनेक प्रवासी विनातपासणी मराठवाड्यात दाखल होत आहेत.विदर्भात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी विदर्भातून येणाऱ्या खासगी व सार्वजनिक बससेवा बंद करण्याचे आदेश दिले. त्यानंतर येलदरी धरण परिसरात मंगळवारी रात्री तपासणीसाठी चौकी स्थापन करण्यात आली. जिंतूर आरोग्य विभाग आणि पोलीस विभागाच्यावतीने या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या मार्गाने मराठवाड्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी करण्याचे नियोजन आहे.
यवतमाळ : २१५ पॉझिटिव्ह
गेल्या २४ तासांत जिल्ह्यात एका मृत्यूसह २१५ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. शिवाय, ५६ जण कोरोनामुक्त झाले. मृतांमध्ये यवतमाळ शहरातील ७१ वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये १२१ पुरुष आणि ९४ महिला आहेत. यात यवतमाळ येथील १०० रुग्ण, दारव्हा २८, पुसद २२, दिग्रस १७, पांढरकवडा १६, वणी १२, नेर १०, झरीजामणी तीन, बाभूळगाव आणि उमरखेड प्रत्येकी दोन, आर्णी, राळेगाव आणि इतर ठिकाणांच्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. बुधवारी एकूण १२७१ अहवाल प्राप्त झाले आहेत.
सोलापूर : रात्रीची संचारबंदी लागू
शेजारील जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढत असला तरी नांदेडची परिस्थिती मात्र सध्या आटोक्यात आहे. तपासण्यांचा वेगही वाढविण्यात आला आहे. आता दुकानदार, विक्रेते अशा सुपर स्प्रेडरसाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटणकर यांनी दिली. अकोला, अमरावती, शेजारील यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे यंत्रणा खडबडून जागी झाली. या जिल्ह्यात सध्या कडक लाॅकडाऊन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूूमीवर नांदेड जिल्ह्यातही यंत्रणेला अलर्ट देण्यात आला होता. यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर मंगळवारपासून तपासणी नाके सुरू करण्यात आले आहेत.