धामणगाव रेल्वे (अमरावती) : शहरातील पहिली कोरोनाबाधित असलेल्या युवतीने कोरोनाला हरवले. मात्र मेंदूज्वर या दुर्धर आजाराने तिचा मंगळवारी पहाटे सावंगी मेघे रुग्णालयात मृत्यू तिचा झाला. धामणगाव शहरातील धवणेवाडी आंबेडकरनगर येथील २१ वर्षीय युवतीला तापाची लक्षणे आढळल्याने प्रथम अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने १७ मे रोजी सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात दाखल केले होते.तिचा थ्रोट स्वॅब घेतला असता, १८ मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह आला, तर तिच्यासोबत असलेल्या आई व दोन बहिणी यांची तपासणी करण्यात आली. १९ मे रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. चौदा दिवसांनंतर परत चारही रुग्णांचा दुसरा थ्रोट स्वॅब तपासणीला पाठविला असता चार दिवसांपूर्वी तो निगेटिव्ह आला होता. मात्र त्या पहिल्या युवतीची पूर्वीपासून मेंदूज्वराच्या आजाराशी झुंज सुरू होती.तिला या आजारातून बाहेर काढण्यासाठी सावंगी मेघे रुग्णालयातील टाक्स फोर्समधील वैद्यकीय चमूने अथक परिश्रम घेतले. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. अखेर मंगळवारी पहाटे ४.१५ वाजता सदर युवतीचा रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती वर्धा येथील जिल्हा शल्यचिकित्सक पुरूषोत्तम मडावी यांनी दिली. सदर युवतीच्या पार्थिवावर वर्धा येथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे मडावी म्हणाले.
CoronaVirus News : धामणगावातील 'त्या' पहिल्या कोरोनाबाधित युवतीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 4:26 PM