लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनापासून बचावासाठीच्या त्रिसूत्रीचे पालन करीत जिल्ह्यातील २७७ गावांनी कोरोनाची पहिली व दुसरी लाट थोपविण्याची किमया साधली आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढले असताना या दोन्ही लाटांदरम्यान आपल्या गावाची वेस सुरक्षित ठेवण्यात या गावांनी यश मिळविले आहे. त्यामुळे या गावांच्या यशाचे नेमके गमक शोधून त्याचा पॅटर्न विकसित करण्याची आवश्यकता आहे.
जवळपास दीड वर्षाच्या अविरत परिश्रमानंतर दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झालेली दिसत आहे. प्रशासकीय यंत्रणा काहीशी थकलेली असली तरी तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी पुन्हा जोरकस प्रयत्न करीत आहे. पहिल्या लाटेचा ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात कोरोनाचा संसर्ग वाढीस लागला होता. दुसऱ्या लाटेत शहरात कोरोना संसर्ग कमी असली तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात मात्र संसर्ग चांगलाच वाढला आहे. कोरोना संसर्गाची वाढती व्याप्ती लक्षात घेता बाधितांच्या जवळून संपर्कातील व्यक्तीचे कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग करण्यात व्यस्त असलेल्या प्रशासकीय यंत्रणेने मोठ्या प्रमाणात नागरिकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला. या गावांनी जाणीवपूर्वक किंवा आपसुकच आचरणात आणलेली जीवनपद्धती व आपल्या दैनंदिन व्यवहारावर घातलेल्या मर्यादांचा महसूल, आरोग्य आणि ग्रामीण विकास विभागातील अधिकाऱ्यांनी अभ्यास केल्यास त्याचा तिसऱ्या लाटेचा मुकाबला करताना उपयोग होऊ शकतो. या गावांनी प्रशासनाच्या त्रिसूत्रीचे प्रामाणिकपणे पालन केल्यामुळे ही गावे आजघडीला कोरोनाच्या संसर्गापासून दूर असल्याचे जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
अनेक तालुक्यांतील गावांचे योगदान
जिल्ह्यात प्रामुख्याने दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेळघाटातील धारणी, चिखलदरा या तालुक्यासह इतरही १२ तालुक्यांमध्ये अनेक गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले. कोरोनाला दोन्ही लाटांमध्ये थोपविणाऱ्या २७७ गावांपैकी अनेक गावे ही आदिवासी व गैरआदिवासी भाग असलेल्या तालुक्यातील आहेत.
असे रोखले कोरोनाला
या गावातील बहुतांश नागरिकांनी संक्रमित शहरी तसेच ग्रामीण भागातील काही मोठ्या गावांपासून स्वतःला दूर ठेवले. यातील बहुतेक गावे दुर्गम व गैरआदिवासी भागातील असल्याने गावकऱ्यांनी शहरी भागात जाणे. जाणीवपूर्वक टाळले. कोणी बाहेरून गावात आल्यास त्यांना दूर ठेवून विलगीकरणात ठेवण्यात आले. विशेष म्हणजे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी प्रभावी जनजागृती, शासन व प्रशासनाने जारी केलेल्या त्रिसूत्रीचे पालन व ग्राम दक्षता समिती, ग्रामपंचायतींनी केलेल्या उपाययोजनांमुळे आजघडीला कोरोना रोखण्यात यश आले आहे.
कोरोनाच्या संसर्गापासून ग्रामीण भागातील २७७ गावे दूर आहेत. त्यातील काही गावे आदिवासी व गैरआदिवासी भागातील आतापर्यंत कोरोनाला रोखण्यात या गावांना यश आले. ही समाधानाची बाब आहे. यातील काही निवड गावांनी उपाययोजनांबाबत केलेल्या उपाययोजनांचा अभ्यास करून त्यानुसार इतरही गावात उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
- अविश्यांत पंडा,
मुख्य कार्यकारी अधिकारीजिल्हा परिषद