अमरावती : शहरात शनिवारी सायंकाळी एका मृतासह तीन व्यक्तींच्या घशातील स्रावाचा अहवाल पॉॅझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या १९ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शहर ‘क्लस्टर हॉटस्पॉट’ जाहीर केले असले तरी कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता शहराचा समावेश ‘रेड झोन’मध्ये कधीही होऊ शकतो.
अकोला येथील प्रयोगशाळेकडून सायंकाळी ६ वाजता एकूण १३ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये येथील युसूफनगरातील एका ५२ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. या व्यक्तीला २३ एप्रिल रोजी येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचे शनिवारी दुपारी ३ वाजता रुग्णालयात निधन झाले. त्यांचा थ्रोट स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.
दुसरी ५३ वर्षीय व्यक्ती ही बडनेरा येथील आहे. पेशाने शिक्षक असलेल्या या व्यक्तीला एका खासगी रुग्णालयातून येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. तिसरी ३३ वर्षांची व्यक्ती तारखेड येथील आहे. २३ एप्रिलला घरी मृत झालेल्या ४० वर्षीय महिलेची ती जवळची नातेवाईक आहे. सदर व्यक्ती इन्स्टिट्यूशनल क्वॉरंटाइन होती.
अमरावतीमध्ये आतापर्यंत १९ व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्या. त्यापैकी सहा व्यक्तींचा मृत्यू झाला असून, चार कोरोनामुक्त झाले आहेत. नऊ व्यक्तींवर उपचार सुरू असल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांनी दिली.