अमरावती : येथील क्लस्टर हॉटस्पॉटमधील तीन तरूणांच्या घशातील स्त्रावाचा तपासणी अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ४३ वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील वरूड तहसीलदारांच्या वाहनचालकाची पत्नी शुक्रवारी नागपूरला पॉसिटिव्ह आढळल्याने महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली. येथील हॉटस्पॉटमध्ये सुफियान नगरात २२ वर्षीय, नालसाबपुरा येथे १० वर्षीय व खोलापुरी गेट येथे २६ वर्षीय युवकांचा थ्रोट स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. त्यामुळे शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या आता ४३ झाली. यामध्ये ७ मृत, ४ कोरोनामुक्त व ३२ व्यक्तींवर येथील कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वरूड तहसीलदारांच्या वाहनचालकाची पत्नी पॉझिटिव्ह जिल्ह्यात वरुड तहसीलदार यांच्या वाहनचालकाच्या पत्नीचा अहवाल शुकवारी पॉझिटिव्ह आल्याने तहसीलदारांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती आरडीसी नितीन व्यवहारे यांनी दिली. ती ५० वर्षीय महिला वडिलाचे निधन झाल्याने यवतमाळला गेली होती. घरी परतल्यावर त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना वरूड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले व तेथून नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रूग्णालयात हलविण्यात आले होते. शुक्रवारी त्यांचा नमुना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जीएमसीव्दारा वरूड तहसील कार्यालयास देण्यात आली. त्यामुळे तहसीलदार यांना १४ दिवस गृह विलगीकरणात, तर खासगी रुग्णालयातील १० व्यक्ती अमरावती येथील संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती नितीन व्यवहारे यांनी दिली. या बाधित महिलेची नोंद नागपूर येथे केली जाणार आहे व त्यांच्यावर नागपूरलाच उपचार सुरू राहणार असल्याचे ते म्हणाले.
CoronaVirus : अमरावतीमध्ये आणखी तीन पॉझिटिव्ह, कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ४३
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2020 6:09 PM