अमरावती : येथील बफर झोनमध्ये नव्याने दोन वृद्ध महिलांना मृत्यूनंतर कोरोना असल्याचे निदान करण्यात आले. बुधवारी उशिरा रात्री अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी या माहितीला दुजोरा दिला. दोघींपैकी एका ७० वर्षीय महिलेचा हैदरपु-यातील त्यांच्या राहत्या घरी मंगळवारी मृत्यू झाला होता. कमेला ग्राऊंड भागातील दुस-या ६० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात मंगळवारी मृत्यू झाला. मृत्यूपश्चात दोन्ही महिलांच्या घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी विषाणू विज्ञान प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. बुधवारी उशिरा रात्री त्याचे अहवाल प्राप्त झाले. हैदरपु-यातील मृत महिला, यापूर्वी हैदरपु-यातच कोरोनाने मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील असण्याची शक्यता जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ‘लोकमत’शी बोलताना वर्तविली. या दोन्ही कोरोनाग्रस्त महिलांच्या संपर्कातील मनुष्यसाखळीचा महापालिकेचा आरोग्य विभाग शोध घेत असल्याची माहिती जिल्हाधिका-यांनी दिली. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आठ झाली असून, त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित पाच जणांवर कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहे. तिघांची प्रकृती सुधारण्याच्या मार्गावर आहे.
coronavirus : अमरावतीमध्ये आणखी दोन मृत महिला पॉझिटिव्ह, कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 11:24 PM