तिवसा : तालुक्यातील वऱ्हा येथे केलेले बांधकाम व प्रलंबित देयके काढून देण्याच्या मोबदल्यात १५ हजार रुपये लाच स्विकारणाऱ्या विस्तार अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. संजय गणपतराव भेलावू (५२) असे अटक आरोपीचे नाव असून ते तिवसा पंचायत समितीत विस्तार अधिकारी (सांख्यिकी) म्हणून कार्यरत आहेत. स्थानिक तिवसा पंचायत समिती कार्यालयात ९ सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदार वऱ्हा येथील रहिवाशी आहेत. नागरी सुविधेअंतर्गतचे बांधकाम व चौदाव्या वित्तआयोगांतर्गत सिमेंट रोड, नाली, फेनसिंग, पेविंग ब्लॉक इत्यादी बांधकामाचे देयक मंजूर केल्याच्या मोबदल्यात व प्रलंबित देयक देण्याकरिता त्यांना भेलाऊ यांने १५ हजार रुपये लाच मागितली. ती स्विकारताना त्याला रंगहाथ पकडण्यात आले. एसीबीच्या अमरावती घटकाने ही कारवाई केली.