लोकमत न्यूज नेटवर्क चांदूर बाजार : तहसीलदार गीतांजली गरड यांच्यासह किरण बेलसरे या खासगी व्यक्तीला शेत फेरफार करून देण्यासाठी लाच मागणी करणे आणि प्रोत्साहन केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ताब्यात घेऊन चौकशी पूर्ण झाल्यावर अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, २८ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानुसार त्यांची मंगळवारी न्यायालयात हजेरी होणार आहे.
याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तहसील कार्यालयामधील ४ ते ५ अधिकारी आणि कर्मचारी यांचे बयाण घेतले असून, संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. चांदूर बाजार तालुक्यातील ही कारवाई जरी पहिलीच असली तरी अनेक ठिकाणी तालुक्यात शेतकऱ्यांची आर्थिक लूट होतच राहते. त्यामुळे आता या प्रकरणापासून किती सुधारणा होणार हे पाहावे लागेल. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत तहसीलदार गरड यांचे निलंबन झाले नव्हते. तर चांदूर बाजार तहसीलचा तहसीलदार पदाचा पदभार हा रूनय जक्कुलवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तसा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिनांक २७ मे रोजी काढला आहे. त्यामुळे आता नियुक्त करण्यात आलेल्या तहसीलदारांसमोर अवैध वाळू तस्करी, अधिकारी व कर्मचारी यांचे तालुक्यातील मुख्यालयी राहण्याचा विषय, अधिकारी ओळखपत्र असे अनेक विषयांचे आव्हान राहणार आहे. गीतांजली गरड यांच्या निलंबनाकडे महसूल यंत्रणेचे लक्ष लागले आहे.
कार्यालयात खासगी कर्मचारी कोणाच्या आदेशाने ?तहसील कार्यालयात ७ ते ८ जण हे मागील अनेक वर्षांपासून खासगी कर्मचारी म्हणून काम करत आहेत. त्यांची नियुक्त्ती कशी करण्यात आली हा मोठा प्रश्न आहे. अनेक तलाठ्यांकडे १ ते २ खासगी कर्मचारी कार्यरत आहेत. या खासगी व्यक्तींच्या माध्यमातून काही तलाठी सातत्याने चिरीमिरी करीत असल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांकडून केला जात आहे. त्यामुळे यावर नवनियुक्त तहसीलदार काय निर्णय घेणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तहसीलमध्ये खोक्यातून आर्थिक नियोजन?तहसील कार्यालयात अनेक आर्थिक व्यवहार हे परिसरात लागलेल्या ई - सेवेच्या नावावर असलेल्या खोक्यातून चालत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता ते खोके आणि खोके मालक यांच्यावर कोण, कधी व कशी कारवाई करणार, अशी चर्चा रंगात आहे. एसीबीचा देखील वॉच आहेच.