लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पाणीटंचाई निवारणार्थ राबविलेल्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेत ६.७५ लाखांच्या भ्रष्टाचारावर थेट न्यायालयानेच शिक्कामोर्तब केले आहे. न्यायालयीन आदेशानुसार, त्या भ्रष्टाचाराप्रकरणी शिरजगाव कसबा पोलिसांनी २४ एप्रिल रोजी दुपारी दोन शाखा अभियंत्यांसह सरपंच व ग्रामसेवकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. कुन्हा देशमुख येथे ३१ डिसेंबर २०१८ मध्ये तो आर्थिक भ्रष्टाचाराचा प्रकार घडला होता.
याप्रकरणी, अमरावती जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपकार्यकारी अभियंता जितेंद्र गजबे (५८) यांनी तक्रार नोंदविली. त्याआधारे, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, अचलपूरचे शाखा अभियंता विजय झटाले व दीपक डोंगरे यांच्यासह कुन्हा देशमुख येथील सरपंच सविता कड्डू व ग्रामसेवक एस. एम. भांडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याने जिल्हा परिषद वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. वर्ष २०१८ मध्ये ग्रामपंचायत कुन्हा देशमुख येथे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे तेथे ग्रामपंचायतींतर्गत १५ लाख रुपये खर्चुन तात्पुरती पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली होती. त्या योजनेमध्ये चारही आरोपींनी ६.७५ लाख रुपयांचा भ्रष्टाचार करून शासनाची फसवणूक केली तथा पैशाचा अपहार केल्याची तक्रार जिल्हा परिषदेकडे करण्यात आली होती. त्यावर जिल्हा परिषदेने चौकशी समितीदेखील स्थापन केली होती. समितीने चौकशी अहवालाअंती त्यात आर्थिक अपहार झाल्याचा निष्कर्षदेखील काढला.
नागपूर खंडपीठात याचिकाभ्रष्टाचाराबाबत वर्ष २०२३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिकादेखील दाखल करण्यात आली. त्यावर न्यायालयाने १९ मार्च २०२४ च्या आदेशाने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला दिले. त्याआधारे न्यायालयीन आदेश व उपकार्यकारी अभियंत्यांच्या लेखी तक्रारीवरून शिरसगाव कसबा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
कुहा देशमुख येथील ग्रामीण पाणीपुरवठा योजनेत झालेल्या आर्थिक अपहारप्रकरणी चौकशी समितीदेखील गठित करण्यात आली होती. अहवालातही त्यावर शिक्कामोर्तब झाले होते. अलीकडे त्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. सबब, पोलिस ठाण्यात लेखी तक्रारनोंदविली.
- जितेंद्र गजबे, उपकार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा