अमरावती : कापसाला मागच्या हंगामात उच्चांकी १३,००० रुपये क्विंटल असा दर मिळाला. यंदाच्या हंगामात मात्र, दरात चढ-उतार आहे. पाच दिवसांत कापूस पुन्हा ८,००० रुपयांवर आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरवाढीच्या अपेक्षेत साठवणुकीकडे शेतकऱ्यांचा कल आहे. सद्यस्थितीत दरवाढीची शक्यता नसल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.
गतवर्षी कापसाला विक्रमी भाव मिळाल्याने यंदाच्या खरिपामध्ये कपाशीचे विक्रमी क्षेत्र राहिले आहे. २.२३ लाख हेक्टर क्षेत्र असताना जुलै ते सप्टेंबरदरम्यान संततधार पाऊस व अतिवृष्टीने एक लाख हेक्टरवरील कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे सरासरी उत्पादनात मोठ्या प्रमाणात कमी आलेली आहे. कमी प्रतवारीच्या शेतात दोन ते तीन वेच्यानंतर उलंगवाडी झाल्याचे दिसून येते.
अलीकडे कपाशीचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातुलनेत हमीभाव मिळालेला नाही. खासगीत हमीभावापेक्षा जास्त भाव असल्याने शेतकरी खासगी व्यापाऱ्यांकडे कापसाची विक्री करीत आहे. सुरुवातीला खेडा खरेदीतही शेतकऱ्यांची लूट झालेली आहे. त्यानंतर ८५०० ते ९००० हजारांपर्यंत असलेला दर आता ८००० हजारांपर्यंत आल्याने शेतकऱ्यांचा कल दरवाढीच्या प्रतीक्षेत साठवणुकीकडे आहे.
कापसाचे बाजारभाव (रु./क्विं.)
१ फेब्रुवारी : ८१५० ते ८२००
२ फेब्रुवारी : ८१०० ते ८१५०
३ फेब्रुवारी : ८०५० ते ८१००
४ फेब्रुवारी : ८०५० ते ८१००
६ फेब्रुवारी : ७९०० ते ८०००
सरकीच्या दरात घसरणीमुळे फटका
सध्या सरकीचा दर ३४०० रुपये क्विंटल आहे. मागच्या आठवड्यात हेच दर ३६०० रुपयांपर्यंत होते. याशिवाय वायदे बाजारात कापूस १३ फेब्रुवारीपासून समाविष्ट होणार आहे. यूएसमध्ये कापसाचे भाव ८६ सेंट पर पाऊंड असे यापूर्वी होते, त्यामध्येही अंशत: कमी आलेली आहे. रुईचे दरही १६८ रुपये किलोवर आहे, ते १७० रुपये होते. याचा परिणाम झाल्याने दरात कमी आलेली आहे.
काही प्रमाणात वाढणार दर!
कापसाचा वायदे बाजार आता १३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे व यामध्ये आगामी वेध घेतला जात असल्याने काही प्रमाणात वाढीची शक्यता व्यापारी सूत्रांनी वर्तविली. आगामी चार महिन्यांच्या काळात कापसाच्यश दराची स्थिती काय राहणार? याचा अंदाज व्यापाऱ्यांना येत असल्याने कापसाची चमक वाढण्याची शक्यता असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.
सध्या सरकीच्या दरात २०० रुपयांपर्यंत कमी आलेली आहे. यामुळे तेलाचे भावही कमी झाले अन् कापसाच्या दरातही २०० रुपयांपर्यंत कमी आलेली आहे. १३ तारखेनंतर वायदे बाजारात कापूस आल्यानंतर दरवाढीचे माहीत पडेल.
- पवन देशमुख, तज्ज्ञ, बाजार समिती, अमरावती.