नांदगावात खरेदी केंद्र सुरू करण्यापूर्वी ३०० शेतकऱ्यांना अमरावती येथील कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी पाठवले होते. यातील १२३ जणांनी आपला कापूस अमरावती केंद्रावर विक्रीसाठीही नेला होता. पण आता नांदगावात शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झाल्याने अमरावती केंद्रावर कापूस न नेलेल्या उर्वरित शेतकऱ्यांना येथील केंद्रावर कापूस विक्रीसाठी बोलाविण्यात येणार आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
नांदगावात नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना अमरावती येथे कापूस विक्रीसाठी नेणे अडचणीचे ठरत होते. नांदगावात कापूस खरेदी केंद्र सुरू व्हावे, यासाठी येथील मानकचंदजी जैन व तालुक्यातील शेतकऱ्यांनी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्याकडे धाव घेतली होती. जगताप यांनी शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी नांदगावात कापूस खरेदी केंद्र उघडण्यात यावे, ही समस्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासमक्ष मांडली. पालकमंत्र्यांनी तो प्रस्ताव पणन महासंघाच्या अध्यक्षांकडे मांडला. त्यांनी या प्रस्तावाला मंजुरी देऊन नांदगावात २८ डिसेंबर रोजी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झाले.