अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील धनेगाव येथील शेतकरी आत्महत्या प्रकरण ताजेच असताना पुन्हा पाच शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले. पैकी एका शेतकऱ्याने शुक्रवारी अंजनगाव पोलिसांत तक्रार दिली आहे. जिनिंगमालकाकडून मिळालेले धनादेश वटविले न गेल्याने त्यांनी पोलीस व बाजार समितीकडे धाव घेतली.
दर्यापूर तालुक्यातील चार व अकोट येथील एका शेतकऱ्याने अंजनगाव सुर्जी येथील अल उमर जिनिंगमध्ये कापूस विकला. जिनिंग मालकाने रोख न देता त्यांना धनादेश दिले. परंतु ते धनादेश बँकेत दिले असता, वटविल्या गेले नाहीत. पैसे न मिळाल्याने त्या पाच शेतकऱ्यांनी अल उमर जिनिंगमध्ये जाऊन पैशांची मागणी केली. मात्र, त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाली. सुरेश जगन्नाथ कुलट, दिगंबर रामराव मंगळे, शरद नारायण मंगळे, निवृत्ती दिनकर मंगळे, दिनकर जगन्नाथ मंगळे या पाच शेतकऱ्यांना त्यांच्या २०७ क्विंटल कापसाच्या मोबदल्यात ११ लाख ९० हजार १५० रुपयांचे धनादेश देण्यात आले होते.
यासंदर्भात शेतकऱ्यांनी स्थानिक बाजार समितीकडे धाव घेतली. सबब, सचिव गजानन नवघरे हे यासंदर्भात पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेले. परंतु धनादेश अनादरचे प्रकरण असल्याने न्यायालयात प्रकरण दाखल करावे, अशी सुचना पोलिसांकडून करण्यात आली.
कोट
धनादेश अनादरप्रकरणी बाजार समितीने तात्काळ दखल घेत पाचही लोकांची सामूहिक तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. संबंधित व्यापारी व जिनिंग मालकांनी शेतकऱ्यांची रक्कम परत केली नाही, तर जिनिंग मालकाचा परवाना रद्द करून कायदेशीररीत्या रक्कम वसूल केली जाईल.
- गजानन नवघरे, सचिव
बाजार समिती, अंजनगाव सुर्जी
कोट २
तक्रार प्राप्त झाली. संबंधित व्यापाऱ्याच्या बँक खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने धनादेश वटविले गेले नाही. याबाबत चौकशी करून कारवाई केली जाईल.
- राजेश राठोड, ठाणेदार, अंजनगाव सुर्जी
-----------