शेंदूरजनाघाटमध्ये घडामोड : अडीच वर्षांचा कार्यकाळ संपला वरूड : शेंदूरजनाघाट नगरपरिषदेमध्ये नेहमीच राजकीय हस्तक्षेपामुळे नगराध्यक्ष, उपाध्यक्षपदाचे वाद निर्माण झाल्याचा इतिहास आहे. आता अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतरही नगराध्यक्षांनी राजीनामा दिला नाही. त्यामुळे तर्क-वितर्क काढण्यात येत आहे.सन २०११ च्या निवडणुकीत विदर्भ जनसंग्रामचे तुल्यबळ वर्चस्व असताना एका नगरसेवकाच्या मदतीशिवाय सत्ता काबीज करणे कठीण होते. परंतु विदर्भ जनसंग्राम, काँग्रेस अशी अभद्र युती होऊन १२ नगरसेवकांवर सत्ता प्राप्त झाली होती. यांनतर अडीच वर्षांचा काळ महिला राखीव असल्याने दावेदारी वाढली होती. हा गुंता सोडविण्याकरिता सव्वा सव्वा वर्षांच्या तडजोडीवर नगराध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक झाली. परंतु मतदानात तफावत निर्माण होऊनही विदर्भ जनसंग्रामची महिला अध्यक्ष तर काँग्रेसचा उमेदवार उपाध्यक्षपदावर विराजमान झाला. राजकीय परिस्थिती बदलत जाऊन शब्दावर कायम राहून उपाध्यक्षाने राजीनामा दिला, पद सोडले. मात्र, नगराध्यक्षाने अद्यापही पद सोडले नसल्याने विविध तर्क-वितर्क काढण्यात येत आहे.शेंदूरजनाघाट नगर परिषद ‘क’ वर्गात येते. येथे १७ सदस्यीय नगरपरिषद आहे. सन २०११ मध्ये सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. तेव्हा काँग्रेसच्या मदतीने विदर्भ जनसंग्रामची सत्ता आली होती. अडीच वर्षांनंतर अध्यक्ष, उपाध्यक्षपद बदलले तेव्हा मात्र अंतर्गत कलहामुळे विदर्भ जनसंग्रामला एका मताची आवश्यकता भासल्याने अपक्षाच्या मदतीने वर्चस्व कायम राहिले. पक्षीय बलाबल तत्कालीन विदर्भ जनसंग्रामच्या ८, काँग्रेसच्या ४, राष्ट्रवादीच्या ४ आणि एक अपक्ष असे १७ नगरसेवक निवडून आले होते. नगराध्यक्षपदाकरिता ९ सदस्यांची गरज होती. ती पूर्ण करण्याकरिता कुण्या पक्षालाही बहुमत नसल्याने पहिल्यांदा काँग्रेससोबत युती करून ८ अधिक ४ असे १२ नगरसेवक आणि एक अपक्ष अशा १३ नगरसेवकांनी नगराध्यक्षपदाकरिता मतदान केले होते. यामुळेच सुभाष गोरडे अडीच वर्षांकरिता नगराध्यक्षपदी विराजमान झाले होते. परंतु उपाध्यक्षपदी काँग्रेसचे लिलाधर डोईजोड विराजमान झाले असले तरी यांना केवळ १२ मतेच मिळाल्याने अपक्ष नगरसेवक जयप्रकाश भोंडेकर स्वत: उपाध्यक्षपदाचे उमेदवार होते. यामुळे ेयांनी मतदान केले नव्हते. अडीच वर्षांनंतर नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव असल्याने जनसंग्रामच्या तीन महिलांनी दावा करून राजकीय कलह निर्माण केला होता. यामध्ये जनसंग्रामच्या नगरसेवकांचे मतदान घेण्यात येऊन सरिता खेरडे यांना पाच तर अर्चना डाहाकेला एक, वैशाली हिवसेला दोन मते पडली होती. पक्षश्रेष्ठी आ. अनिल बोंडे यांनी सरिता खेरडे यांना सव्वा वर्षांच्या काळाकरिता तडजोडीने नगराध्यक्षपदाची उमेदवार म्हणून घोषित केले. उपाध्यक्षपदाचा यापेक्षाही वाद निर्माण झाला होता. जनसंग्रामसोबत काँग्रेसचे अडीच वर्षे लिलाधर डोईजोड तर अडीच वर्षे देवानंद जोगेकर होते. मात्र नंतरच्या अडीच वर्षांकरिता काँग्रेसच्या नगरसेवकांनी देवानंद जोगेकर यांच्या नावाला विरोध केल्याने राजकीय पेच निर्माण झाला होता. परंतु जनसंग्रामने दिलेला शब्द पाळण्याकरिता देवानंद जोगेकर यांच्या पाठीशी उभे राहून उपाध्यक्षपदी निवड करण्याचे ठरविले. जनसंग्रामसोबत ८ अधिक एक असे नऊ होत असताना अपक्ष नगरसेवकांची मदत घेऊन १० चा आकडा पार केला व बहुमतात उपाध्यक्षपद मिळविले. यातसुध्दा तत्कालीन उपाध्यक्ष देवानंद जोगेकर यांनी विद्यमान उपाध्यक्ष जयप्रकाश भोंडेकर यांच्यासोबत सव्वा वर्षाची तडाजोड केली. यावेळी काँग्रेसचे नगरसेवक जोगेकर यांच्यासोबत राहिले असते तर काँग्रेसचे नगरसेवक देवानंद जोगेकर यांना अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला असता. तडजोडीने जोगेकर यांनी सव्वा वर्षानंतर राजीनामा देवून जयप्रकाश भोंडेकर यांच्याकरिता पद रिक्त केले. (तालुका प्रतिनिधी)
नगरपरिषद अध्यक्षपदाचा गुंता कायम
By admin | Published: January 23, 2016 12:41 AM