अमरावती : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या शासन स्तरावरून नुकतीच ऑनलाइन जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया पार पडली. मात्र, या प्रक्रियेत मेळघाट क्षेत्रात सलग तीन वर्षे सेवा दिलेल्या परंतु बदली प्रक्रियेत संधी मिळाली नव्हती. त्यामुळे ७९ शिक्षकांना न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारी जिल्हा परिषदेत समुपदेशन प्रक्रियेद्वारे मेळघाटमधून सपाटीवरील शाळेवर पोस्टिंग देण्यात आली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या उपस्थितीत १४ ऑगस्ट रोजी झेडपीच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात समुपदेशन प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी बुध्दभूषण सोनवने, उपशिक्षणाधिकारी गजाला खान, विस्तार अधिकारी गंगाधर मोहने आदींची यावेळी उपस्थिती होती.
राज्य शासनाच्या धोरणानुसार मेळघाटात जिल्हा परिषदेच्या ७९ प्राथमिक शिक्षकांनी सलग तीन वर्षे सेवा दिली आहे. त्यानुसार हे शिक्षक जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी पात्र होते. मात्र, बदली प्रक्रियेदरम्यान सपाटीवरील भागात या शिक्षकांना रिक्त जागा न दिसल्यामुळे बदलीसाठी पात्र असलेल्या वरील शिक्षकांच्या बदल्या झाल्या नाहीत. त्यामुळे या शिक्षकांनी आपल्यावरील अन्यायाविरोधात न्यायालयात दाद मागितली होती. यावर न्यायालयाने मेळघाटातील बदली अधिकारपात्र वरील शिक्षकांच्या बदल्या करण्याबाबतचे आदेश शासनाला दिले होते.
न्यायालयाच्या आदेशानुसार राज्याच्या शिक्षण विभागाने मेळघाटात सलग तीन वर्षे सेवा दिलेल्या आणि बदलीसाठी पात्र असलेल्या शिक्षकांची समुपदेशन प्रक्रिया राबवून या शिक्षकांना सपाटीवरील शाळेत पदस्थापना करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण विभागाला दिले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने मेळघाटातील ७९ शिक्षकांना सपाटीवरील भागात असलेल्या धारणी व चिखलदरा तालुके वगळता अन्य १२ तालुक्यातील शाळांमध्ये रिक्त असलेल्या जागांवर पोस्टिंग देण्यात आली आहे. समुपदेशन प्रक्रियेला पंकज गुल्हाने, शरद चहाकार, शाम देशमुख, राजेंद्र काळे, चंद्रशेखर टेकाळे, प्रवीण जिचकार, संजय मुंदे तसेच गटशिक्षणाधिकारी संदीप बोडखे आदींचे सहकार्य लाभले.