अमरावती : जिल्ह्याच्या आठही विधानसभा मतदारसंघांचा निकाल १९ आॅक्टोबरला सकाळी ११ वाजेपर्यंत जाहीर होतील, अशी माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिली. धामणगाव रेल्वे मतदारसंघात मतमोजणीच्या सर्वाधिक २६ तर अमरावती मतदारसंघात सर्वात कमी १९ फेऱ्या होणार आहेत. जिल्ह्यात मतदान केंद्राची संख्या विधानसभा मतदारसंघनिहाय धामणगाव रेल्वे ३६२, बडनेरा ३००, अमरावती २६४, अचलपूर २९० आणि मोर्शी २९३ अशी आहे. प्रत्येक मतदारसंघात मतमोजणीसाठी १४ तर दोन टेबल राखीव ठेवले जाणार आहेत. त्या हिशोबाने धामणगाव रेल्वे २६, मेळघाट २५, दर्यापूर २४, तिवसा २३, बडनेरा, अचलपूर, मोर्शी प्रत्येकी २१ तर अमरावतीची १९ फेऱ्यात मतमोजणी होणार आहे. मतदान यंत्र ताब्यात घेणे, टेबलवर आणून सर्वांसमक्ष ते उघडणे आणि कुणाला किती मतदान झाले याची माहिती देणे, शिवाय ते यंत्र आणि त्यासंबंधीची कागदपत्रे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना परत करणे, त्यासंबंधीचा शासकीय सोपस्कार पार पाडणे, यासाठी किमान प्रत्येक फेरीसाठी २० ते ३० मिनिटांचा कालावधी लागू शकतो. धामणगावचा निकाल दुपारी ३ पर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. तर अमरावती मतदारसंघात सर्वात कमी १९ फेऱ्या होणार असल्याने त्यासाठी किमान ३८० मिनिटे (साडेसहा तास) लागू शकतात. पर्यायाने अमरावतीचा निकाल दुपारी १ पर्यंत जाहीर होऊ शकतो. प्रत्येक मतदारसंघात मतमोजणीसाठी जास्तीत जास्त १४ टेबल लावण्याची मर्यादा ठरविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
११२ टेबलवर होणार आठ मतदारसंघांची मतमोजणी
By admin | Published: October 18, 2014 12:48 AM