अमरावती : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघासाठी आज बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यात ६७.२६ टक्के मतदान झाले. १९ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजतापासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. अमरावती व बडनेरा मतदार संघातील मतमोजणी अमरावतीत विलास नगर मार्गावरील शासकीय धान्य गोदामात होणार आहे.धामणगाव रेल्वे मतदार संघाची मतमोजणी चांदूर रेल्वे येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होणार आहे. तिवसा मतदार संघातील मतमाजणी तिवस्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे तर दर्यापूर मतदार संघातील मतमोजणी दर्यापूरच्या शुभम मंगल कार्यालयात होणार आहे. मेळघाट मतदार संघाची मतमोजणी धारणी तालुक्यातील कुसुमकोट येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तर अचलपूर मतदार संघाची मतमोजणी अचलपूरातील कल्याण मंडपम येथे होणार आहे. मोर्शी मतदार संघाची मतमोजणी मोर्शीतील शिवाजी हायस्कूलमधील अण्णसाहेब कानफाडे स्मृती सभागृहात होणार आहे. आज मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर मतदान कर्मचाऱ्यांनी मतदान साहित्य रात्री उशीरापर्यंत त्या-त्या मतदार संघातील मतमोजणी केंद्रावर पोहचते केले आहे. सकाळी ८ वाजतापासून मतमोजणी सुरुवात होणार असून दुपारी १२ वाजेपर्यंत निकाल हाती येण्याचा अंदाज निवडणूक विभागाने वर्तविला आहे. निवडणूक विभागाच्यावतीने जिल्ह्यातील सर्व मतमोजणी केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. तसेच दोन दिवसांपासून मतमोजणी केंद्रात व्यवस्थेची जय्यत तयारी सुरू आहे. दरदिवसाला निवडणूक निरीक्षक व निवडणूक अधिकारी आपआपल्या भागातील मतमोजणी केंद्राच्या तयारीची पाहणी करीत आहे. पोलीस प्रशासनाच्यावतीनेही विशेष दक्षता घेतली जात आहे.
मतमोजणी; स्ट्राँग रुम सज्ज
By admin | Published: October 15, 2014 11:12 PM