कॉमन/ गणेश वासनिक
अमरावती : पुन्हा एकदा चार वर्षांनी भारतातील पट्टेदार वाघांसह महत्त्वाच्या वन्यजीवांच्या प्रगणनेला प्रथमत: आधुनिकतेचा आधार देत सन २०२१ ची व्याघ्र गणना पेपरलेस होणार आहे. पहिल्यांदाच मोबाईल ॲपमध्ये भारतातील वन्यजीवांचे अस्तित्व कैद होणार आहे.
ऑक्टोबर २०२१ मध्ये अखिल भारतीय व्याघ्र प्रगणनेला सुरुवात होणार आहे. पारंपरिक पद्धतीला फाटा देत यंदा. व्याघ्र प्रगणनेत ‘एम स्ट्रेपेस इकाेलॉजिक्स ॲप‘चा वापर करण्याचा निर्णय भारतीय वन्यजीव संस्था आणि राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने घेतलेला आहे. व्याघ्र प्रगणनेसाठी दोन्ही प्राधिकरणाने इकोलाॅजिकल्स नावाचा ऑफलाईन ॲप तयार करून मोबाईलचा वापर या व्याघ्र प्रगणनेत होणार आहे. त्यामुळे प्रगणनेची उत्सुकता लागून आहे. खऱ्या अर्थाने ही प्रगणना पेपरलेस होणार असून, भारतात यावेळी हा इकोलाॅजिकल्स ॲप काम करणार आहे. ही प्रगणना आर्कषणाचा विषय ठरणार आहे.
बाॅक्स
नवीन ॲप करणार चमत्कार
केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाच्या निर्देशानुसार भारतीय वन्यजीव संस्था व राष्ट्रीय व्याघ्र प्रगणना पेपरलेस करतानाच इकोलाॅजिकल्स नावाचा ॲप निर्मिती करून दऱ्या-खोऱ्यात हा ॲप ऑफलाईन पद्धतीने अचूक माहिती गोळा करण्यास क्षणात उपलब्ध होणार आहे. रिमोट सेन्सिंग डाटा वापरून भारतीय वन्यजीव संख्या यावर प्रक्रिया करत असते. या ॲपद्वारे सर्वेक्षण अधिकाऱ्याला प्रथम नोंदणी करावी लागेल. ट्राॅन्झॅक्ट लाईनवर फिरताना दिसलेल्या वन्यजीवांचे जीपीएम लोकेशनचे फोटो काढावे लागेल.
बाॅक्स
वनाधिकारी देणार सेल्फी
व्याघ्र प्रगणना ही एकूण सहा दिवस बिटनिहाय होणार आहे. डिजिटल पद्धतीने इकाॅलाॅजिकल ॲपद्वारे होणाऱ्या या सर्व्हेक्षणात प्रगणकाला दरदिवशी ५ कि.मी. ट्राॅन्झॅक्ट लाईनवर फिरताना स्वत:चा सेल्फी काढावा लागेल. सेल्फी दरदिवशी सक्तीचा केलेला आहे. त्यामुळे ही व्याघ्र प्रगणना अचूक करावी लागणार आहे. शिवाय प्राण्यांचे अंतर मोजण्यासाठी रेंज फायटर, लेझर बीमचा उपयोग केला जाणार आहे.
बाॅक्स
गिधाड पक्ष्यांची काळजी
भारताच्या जंगलातून गिधाड, रानपिंगळा, समुद्री गरूड, माळढोक सारस हे मोठे पक्षी जवळपास संपल्यागत आहेत. याचे संवर्धन व संरक्षण कसे करावे, हा प्रश्न वनविभागासमोर उभा ठाकल्याने भारतातीत या महत्त्वाच्या पक्ष्यांची नोंद घ्यावी लागणार आहे. ज्या भागात त्यांचा अधिवास दिसून येतो, तेथे पक्षीतज्ज्ञ येऊन त्यांच्या संवर्धनाविषयी आराखडा तयार करणार आहे.
-----------
बदलत्या काळानुसार वन्यजीवांची प्रगणनादेखील डिजिटल केली जाणार आहे. पहिल्यांदाच ॲपचा वापर करुन वाघांचे अस्तित्व कैद केले जाणार आहे. आता वेळकाढू, रटाळ प्रगणनेला फाटा मिळणार आहे.
- सुनील लिमये, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव विभाग.