अमरावती, दि. 13- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या तीनही प्राधिकरणांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार, रविवार १५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून १७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. अमरावती विभागांतर्गत अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलडाणा व अमरावती या पाचही जिल्ह्यातील ६३ मतदान केंद्रांवर अधीसभा (सिनेट), विद्यापीठ परिषद व अभ्यास मंडळ या तीनही प्राधिकरणांची निवडणूक होणार आहे. २१ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०१७ या कालावधीत निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. निवडणूक वेळापत्रकानुसार २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत उमेदवारांना नामांकन अर्ज दाखल करता येतील. शुक्रवारी २२ सप्टेंबर रोजी अर्जांची छाननी होऊन शक्यतोवर त्याच दिवशी वैध उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. त्यावर काही आक्षेप असल्यास २६ सप्टेंबर रोजी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्याकडे त्याबाबत सुनावणी होईल. अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २९ सप्टेंबर असून त्याचदिवशी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर १५ आॅक्टोबर रोजी मतदान, तर १७ आॅक्टोबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल.
‘‘सिनेट निवडणूक मतदार यादीची संपूर्ण प्रक्रिया आटोपली आहे. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या मार्गदर्शनात सिनेट निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. जाहीर वेळापत्रकानुसार निवडणुका घेतल्या जातील.- अजय देशमुख,निवडणूक निर्णय अधिकारी, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ