चांदूरबाजार : भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या बलिदानाने देशात क्रांतीची लाट निर्माण झाली. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत उडी घेताना धर्मापेक्षा देशाला प्रथम स्थान दिले. म्हणूनच शहिदांना धर्मापेक्षा देशच श्रेष्ठ होता, असे प्रतिपादन वक्ते अमोल मिटकरी यांनी बेलोरा येथील शहीद भगतसिंग ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाद्वारा आयोजित शहीद कार्यक्रमात केले. अध्यक्षस्थानी ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून गजानन देशमुख, तुषार देशमुख, दादा माधानकर, दादा देशमुख, संजय चव्हाण उपस्थित होते. भारताच्या इतिहासात अनेकांनी क्रांती घडविली आहे. स्वराज्याकरिता माँ जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, शंभाजी महाराज यांनी क्रांती केली. सामाजिक परिवर्तनासाठी महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रयत्न केले. त्यांनी दाखविलेला मार्ग आजही अंगिकारता येण्यासारखा आहे, असेही यावेळी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले. तुकाराम महाराज, गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व डॉ. पंजाबराव देशमुख यांच्यासारखे क्रांतिकारक होऊन गेले तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारक शहीद झाले. संचालन किशोरी राऊत, आभार अतुल देशमुख यांनी मानले. सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. (शहर प्रतिनिधी)
शहिदांना धर्मापेक्षा देशच श्रेष्ठ होता
By admin | Published: March 26, 2015 12:10 AM