अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एप्रिल महिन्यात इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय जाहीर केला. यामध्ये तूर्तास कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यासंदर्भात सुरू असलेल्या अफवांवर पालक, विद्यार्थी, शिक्षकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष शरद गोसावी यांनी केले आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पालकांची चिंता वाढली आहे. ऑफलाईन परीक्षांच्या दरम्यान शारीरिक अंतर आणि सुरक्षिततेचे नियम कसे पाळले जाणार, परीक्षांच्या वेळेत कोणताही बदल करण्यात येणार नाही, परीक्षेची वेळ तीन तासांची असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर त्या ऑनलाईन घेण्यात येतील, अशा अफवा सोशल मिडियावर पसरत आहे. मात्र, यात कोणतेही तथ्य नसल्याची बाब शिक्षण मंडळाने स्पष्ट केली आहे. परंतु, दहावी, बारावीचा अभ्यासक्रम अपूर्ण असल्याने विद्यार्थ्यांमध्ये कमालीची चिंता दिसून येत आहे.
------------------
परीक्षेचे वेळापत्रक
दहावीचे वेळापत्रक : २९ एप्रिल ते २० मे
बारावीचे वेळापत्रक : २३ एप्रिल ते २१ मे
------------------
ऑनलाईन परीक्षांचा पर्याय असावा
परीक्षा ऑनलाईन घ्यायला हव्या होत्या, असे मत ६८.३ टक्के विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने आतापर्यंत केवळ २१ टक्के विद्यार्थ्यांनी ४० ते ५० टक्के स्वत:चा अभ्यास केल्याचे कबूल केले आहे. यंदा शालेय अभ्यासक्रमात २५ टक्के कपात केली आहे. या अभ्यासक्रम कपातीसंदर्भात ५१ टक्के विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम आहे. प्रचलित परीक्षेपेक्षा आराखडा बदलून ५० टक्के गुण बोर्डाने शाळेतील अंतर्गत मूल्यमापन, तर ५० टक्के लेखी परीक्षेस ठेवावे, असे पालकांचे मत आहे.
-------------------
दहावीतील पालकांच्या प्रतिक्रिया
‘‘विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन परीक्षा घेताना कोरोनाचा प्रादुर्भाव, विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय या साऱ्यांचा विचार करूनच नियोजन करायला हवे. कोरोना संसर्गाच्या मानसिक तणावाखाली असताना विद्यार्थी, पालक अशा दोघांचाही विचार करायला हवा.
- रोशन चव्हाण, पालक.
-------
‘‘ वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुलांसह आम्हीही प्रचंड तणावात आहोत. शाळा सुरू नसल्याने आपण इतराच्या तुलनेत कमी गुण मिळवू, अशी भीती विद्यार्थ्यांना वाटत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाचा पर्याय निवडायला हवा.
- तेजस्वीनी आखरे, पालक.
--------------
ऑनलाईनने विद्यार्थ्यांचा ६० टक्केच अभ्यासक्रम झाला आहे. विद्यार्थ्यांचा सर्वंकष विचार करून मंडळाने मूल्यमापनाची पद्धती अवलंबवायला हवी. याच अभ्यासाच्या आधारे मंडळाने प्रचलित पद्धतीचा हट्ट न धरता परीक्षेचे नियोजन करावे.
- प्रीती डोंगरे, पालक.
-------------------
बारावीतील पालकांच्या प्रतिक्रिया
परीक्षांचे नियोजन ऑनलाईन पद्धतीने करायला हवे. मात्र, एमसीक्यू पद्धतीने परीक्षा घेतल्यास गुणांचे नियोजन अवघड होणार आहे, याची आम्हाला जाणीव आहे. तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याविषयी विचार करावा.
- अर्चना उके, पालक.
----------
विद्यार्थ्यांच्या अकाऊंट, गणित यासारख्या विषयांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने अवघड होणार आहे. त्यामुळे परीक्षा पद्धत, गुण पद्धतीत मंडळाने बदल करण्याचा विचार होणे आवश्यक आहे. त्याचा विचार व्हावा.
- मीनाक्षी देशपांडे, पालक
--------------
शिक्षण मंडळाने कोरोना संसर्गाच्या काळात परीक्षांचे नियोजन करताना ५० टक्के शाळांकडे, ५० टक्के ऑफलाईन परीक्षा यांच्यामार्फत करायला हरकत नाही. यापेक्षा सहज, सोपा इतर पर्याय असेल तर त्याचाही विचार करायला हवा.
- रवि शर्मा, पालक