अमरावती - मद्यपी पतीच्या मारहाणीनंतर घरातून हाकलून लावलेल्या पत्नीला न्यायालयात खटला दाखल होण्याच्या तासभरातच सरंक्षणासह निवास मिळून देण्यात आला. न्यायालयाच्या आदेशावरून सरंक्षण अधिकाºयांनी शुक्रवारी ही कारवाई केली. धामणगाव रेल्वेच्या इतिहासात प्रथमच असा अनुभवास आला. धामणगाव रेल्वे येथील रहिवासी महिला सारिका (३०) यांचा विवाह १३ आॅगस्ट २००५ रोजी गंगाधर मुलवंडे यांच्याशी झाला. पानठेला चालविणारे गंगाधरने लग्नानंतर दिडेक वर्षे पत्नीसोबत चांगला संसार केला. मात्र, त्यानंतर त्याला मद्याचे व्यसन जडले, तो पत्नीचा कौटुंबिक छळ करू लागला. पतीचा त्रास सहन करीत संसाराचा गाडा चालविणाºया सारिकाला दोन मुली आहेत. मद्यधुंद अवस्थेत गंगाधर पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करीत होता. ती कसेबसे दिवस काढत होती. मात्र, ३० आॅगस्ट २०१८ रोजी रात्री २ वाजता गंगाधरने पत्नीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तिने कशीबशी रात्र काढली, मात्र, सकाळीच बहीण प्रियंकाचे घर गाठून कौटुंबिक छळ सहन न झालेल्या सारिकाने धामणगावातील सरंक्षण अधिकारी कार्यालय गाठले.सरंक्षण अधिका-यांनी त्यांची तक्रार तत्काळ नोंदवून दिवाणी व फौजदारी न्यायालयात पाठविली. सारिकाला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. वैद्यकीय अधिकारी आशिष सालनकर यांनी वैद्यकीय अहवाल मिळवून सरंक्षण अधिकारी कुलदीप गावंडे यांनी प्रकरण न्यायालयात दाखल केले. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी के.ए.नहर यांनी प्रकरणाची तत्क्षण दखल घेऊन सरंक्षण (कलम १८) व निवासाचा आदेश (कलम १९ अन्वये) पारित केले. याची अमंलबजावणी करण्यासाठी सरंक्षण अधिकारी कुलदीप गावंडे, दत्तापूर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन कानडे, पोलीस कर्मचारी मोनाली बोडके व मंगेश लकडे यांनी पीडिताला घरी प्रवेश मिळून दिला. याशिवाय पीडिताचा कौटुंबिक छळ करू नये आणि घराबाहेर हाकलू नये, असे पतीला बजावण्यात आले. विशेष म्हणजे न्यायालयात प्रकरण दाखल झाल्याच्या तासाभरात आदेशाची अंमलबजावणी करीत पीडित महिलेला न्याय मिळाल्याची ही पहिलीच वेळ आहे.
कौटुंबिक हिंसाचार ही एक मोठी सामाजिक समस्या आहे. पीडितांनी कुठल्याची प्रकारचा कौटुंबिक हिंसाचर सहन न करता, सरंक्षण अधिका-यांकडे दाद मागावी.- कुलदीप गावंडे, सरंक्षण अधिकारी, धामणगाव रेल्वे