अमरावती : पुतणीच्या अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर मद्यपी भावंडांनी चुलत भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री पुसदा पुनर्वसन परिसरात घडली. अनिल रामदास इंगोले (३२, रा. भुतेश्वरनगर, नागपूर) असे मृताचे नाव आहे. या हत्या प्रकरणात वलगाव पोलिसांनी गजानन विष्णुजी इंगोले आणि तुळशीदास विष्णुजी इंगोले (दोन्ही रा. नाईक तलाव, लालगंज पोलीस चौकीच्या मागे, नागपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. दोन्ही आरोपी पसार झाले असून, त्यांच्या शोधार्थ वलगाव पोलीस रवाना झाले आहे.
पुसदा पुनर्वसन परिसरातील रहिवासी सुनील लक्ष्मणराव इंगोले (४१) यांची मुलगी काजल हिचे पोटाच्या आजारामुळे निधन झाले. तिच्या अंत्ययात्रेकरिता गुरुवारी सायंकाळी इंगोले कुटुंबातील सर्व नातेवाईक सुनील इंगोले यांच्या पुसदा पुनर्वसन येथील घरी आले होते. यामध्ये नागपूरहून आलेले अनील इंगोले, गजानन इंगोले आणि तुळशीराम इंगोले यांचासुद्धा समावेश होता. सायंकाळी काजलच्या पार्थिवावर अंत्यविधी झाल्यानंतर सर्व नातेवाईक स्मशानभूमीतून घरी पोहोचले.
दरम्यानच अनिल इंगोले, गजानन इंगोले आणि तुळशीराम इंगोले शिराळा येथून मद्यप्राशन करून सुनील यांच्या घरी पोहोचले. रात्रीच्या १० वाजताच्या सुमारास तिघेही सुनील इंगोले यांच्या घराच्या अंगणात बसले होते. त्यावेळी गजानन आणि तुळशीराम यांनी काही कारणास्तव अनिल इंगोलेशी वाद घातला. त्यानंतर त्या दोघांनी बॅटने अनिलच्या डोक्यावर व हातावर जबर मारहाण केली. या मारहाणीत अनिल गंभीर जखमी झाले. अंगणातील हा गोंधळ पाहून घरात जेवण करीत असलेले सुनिल बाहेर आले. त्यांनी जखमी अनिलला तत्काळ उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. शुक्रवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास अनिलचा मृत्यू झाला. घटनेच्या तक्रारीवरून वलगाव पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. घटनेनंतर दोन्ही आरोपी पसार झाले. त्यांच्या शोधात वलगाव पोलीस नागपूरला रवाना झाले.