अनिल कडूलोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : कोरोना रुग्ण नसल्यामुळे जिल्ह्यातील सर्व कोविड केअर सेंटर कुलूपबंद आहेत. सेंटरवर चौकीदारांचे राज्य आहे. सर्वत्र धुळीसह कचऱ्याचे साम्राज्य असून कित्येक दिवसांपासून त्यात झाडूही मारला गेलेला नाही. यातील साहित्य गोळा करून ठेवण्यात आले आहे. गाद्या उभ्या करण्यात आल्या असून, पलंग जमा करण्यात आले आहेत. तेथील कार्यरत कर्मचाऱ्यांना इतरत्र हलविण्यात आले आहे. काहींना कामावरून कमी करण्यात आले आहे. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात एक कोविड केअर सेंटर आणि अचलपूरमध्ये दोन कोविड सेंटर विचारात घेता, एकूण १६ कोविड सेंटर कोरोना काळात सुरू करण्यात आले होते. हे १६ केअर सेंटर आज बंद आहेत. या कोविड केअर सेंटर सोबतच अचलपूरमध्ये एक शासकीय डेडिकेटेड कोविड रुग्णालय आणि तीन खासगी रुग्णालय कोरोना काळात अस्तित्वात होते. या सोबतीला जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड रुग्णालय, पीडीएमसीतील कोविड रुग्णालयासह अमरावती शहरात सात खासगी कोविड रुग्णालये कोरोनाकाळात कार्यरत होते. सध्या रुग्ण नसल्यामुळे शासकीय रुग्णालय वगळता अमरावती शहरासह जिल्ह्यातील सर्व खासगी कोविड रुग्णालये बंद असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली. रुग्णालय बंद करीत असल्याचे पत्रही संबंधितांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे दिल्याचे त्यांनी सांगितले. परतवाडा शहरातील तीनही खासगी कोविड रुग्णालयांनी आपले नाम फलक काढून घेतले आहेत. ही कोविड रुग्णालये त्यांनी बंद केली असून, तेथील कर्मचारी वर्गही कमी केला आहे. केवळ चौकीदार तेवढा दुहेरी भूमिकेत तेथे वावरत आहे. शासकीय डेडिकेटेड कोविड रुग्णालयांतर्गत परतवाड्यातील ट्रामा केअर युनिटला आणि डेडिकेटेड कोविड रुग्णालयाला कुलूप लावण्यात आले आहे. आठ ते दहा दिवसांपासून या डेडिकेटेड कोविड रुग्णालयात एकही कोरोना रुग्ण दाखल नाही. त्यामुळे तेथील कर्मचारीवर्ग अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आला आहे. या रुग्णालयातील कार्यालयाचे गेट तेवढे उघडे आहे. एक नर्स आणि एक चौकीदार तेथे बघायला मिळतो. तेथील डॉक्टर फोन कॉलवर ठेवण्यात आले आहेत.
बंद सेंटरचा वाली सुरक्षा चौकीदारबंद असलेले कोवीड केअर सेंटर चौकीदाराच्या भरोशावर सोडण्यात आले आहे. या बंद सेंटरचा वाली चौकीदार असला तरी बरेचदा तोही या ठिकाणी आपल्या कामावर दिसून येत नाही. यात काही सेंटर वरून साहित्यही चोरीला गेले आहे.
कोठे पडला कचरा तर कोठे मोकाट जनावरेपरतवाड्यातील डेडिकेटेड कोवीड रुग्णालयाच्या मागील बाजूस, ट्रामा केअर युनिटच्या आणि बच्चू कडूंच्या आयसोलेशन सेंटरवर दर्शनी भागात कचरा आणि धूळ बघायला मिळाली. मोकाट जनावरांचा येथे मुक्तसंचार आहे.
आयसोलेशन परिसरात म्हशींचा वावर वाढलाडेडिकेटेड कोविड रुग्णालय अचलपूर आणि ट्रामा केअर युनिट परिसरात वराहाचा संचार बघायला मिळाला. श्वानांच्याही येरझारा चालूच होत्या. काही सरपटणारे प्राणी ही बघायला मिळालेत. याबाबत उपस्थिती असलेल्याला विचारले असता, रुग्ण नसल्यामुळे त्यांना खायला मिळत नाही. त्यामुळे या परिसरातील वराहांची संख्या कमी झाल्याचे त्याने सांगितले. अचलपूर नगरपालिकेच्या कल्याण मंडपम येथील बच्चू कडूंच्या आयसोलेशन सेंटरपासून काही अंतरावर त्याच परिसरात पाळीव म्हशीचे शेन बघायला मिळाले. त्या परिसरात म्हशींचा वावर असल्याचे दिसून आले