वरूड / बेनोडा : तालुक्यात कोरोनाचा दिवसेवास प्रादुर्भाव वाढत आहे. आमदार देवेंद्र भुयार यांनी आरोग्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून कोविड रुग्णालयाचे काम युद्ध स्तरावर सुरू केले आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी दौरा करून आढावा घेतला. गुरुवारी जिल्हा शल्यचिकित्सक शामसुंदर निकम यांनी बेनोडा येथील आरोग्य केंद्रात जाऊन कोविड रुग्णालयाचा कामाचा आढावा घेतला. १७ मे ला रुग्णालय कार्यान्वित करून लोकार्पणाचे आदेश वजा सूचना दिल्या. तातडीने ऑक्सिजन असलेले ५० खाटांचे कोविड रुग्णालय सुरु होत असल्याने परिसरातील रुग्नांना दिलासा मिळणार आहे .
वरूड तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. बेनोडा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ५० खाटांचे रुग्णालय सुरू करण्याच्या हालचाली होऊन मंगळवारला जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दौरा करून अधिकाऱ्यांना तातडीने काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. गुरुवारी जिल्हा शल्य चिकित्सकांनी रुग्णालयाची पाहणी करून कामाबद्दल समाधान व्यक्त केले तर १७ मे ला कोविड रुग्णालया कार्यान्वित करून लोकार्पित करावे, असे स्पष्ट आदेश दिल्याने युद्धस्तरावर काम सुरु आहे . नोडल अधिकारी तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ . प्रमोद पोतदार, बेनोडा वैद्यकीय अधिकारी सोहेल खान, सहायक नोडल अधिकरी सुधाकर राऊत, आरोग्य सेवक राजेंद्र शेळके, रोशन दारोकर यावेळी उपस्थित होते. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह ३१ कर्मचार्याच्या नियुक्तीला मान्यता देण्यात आली. सुसज्ज कोविड रुग्णालयात एक फिजिशियन हृदयरोगतज्ज्ञ, एक एमबीबीएस डॉक्टर, २ बीएएमएस डॉक्टर, ११ एएनएम, ६ सफाई कामगार, १० कक्ष सेवक यांना जिल्हाशल्य चिकित्सकांनी नियुक्ती केली. नोडल अधिकरी म्हणून प्रमोद पोतदार राहतील. तातडीने ऑक्सिजन असलेले ५० खाटांचे कोविड रुग्णालय सुरु होत असल्याने परिसरातील रुग्नांना दिलासा मिळणार आहे .