अमरावती :लग्न हा समारंभच झाला आहे. कोरोनाने या स्थितीला बदलले तरी आता संक्रमण दर कमी असण्याच्या काळा पुन्हा या समारंभातील खर्चीक बाबींनी डोके वर काढले आहे. तथापि, चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथे या खर्चाला फाटा देण्याचा प्रस्ताव वरपक्षाकडून आला नि वधुपक्षाने स्वीकारला. यामुळे साक्षगंधाकरिता आलेला अनूप हा दामिनीला या सोहळ्यानंतर पुढील काही तासांत लग्न करूनच घेऊन गेला.
लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हणतात. आपल्या मुलीचं धुमधक्यात लग्न व्हावं अशी प्रत्येक बापाची इच्छा असते. मात्र, कोरोनामुळे अनेकजणांची थाटामाटात लग्नाची इच्छा अपुरी राहिली. तर, काही जणांनी मात्र, अगदी साधेपणाने चार माणसांत लग्न आटोपले. व आता ओमायक्रॉनमुळे पुन्हा एकदा निर्बंध आले. या परिस्थितीचा विचार करत साक्षगंधाकरता आलेल्या नवरदेवाने लग्नच करायचे ठरवले. त्याला नवरीच्या घरच्यांनीही पाठिंबा दिला व हा लग्नसोहळा आनंदात पार पडला.
धामणगाव रेल्वे तालुक्यातील दाभाडा येथील रहिवासी असलेले नंदकिशोर व अनू कोकाटे यांचा मुलगा अनूप याचे साक्षगंध चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील गजानन व शारदा मिरचापुरे यांची मुलगी दामिनी हिच्याशी पार पडले. परंतु, साक्षगंधानंतर वेळेवर लगेच विवाह करण्यासाठी वराकडील मंडळीनी प्रस्ताव ठेवला. व वधूकडील मंडळींनी याला होकार देत अवघ्या काही तासांतच लग्नाची तयारी झाली. या आदर्श विवाहाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आईला वेळेवर आणले मंडपात
नवरदेव अनूप कोकाटे यांची आई अनू कोकाटे या साक्षगंधासाठी घुईखेड येथे आल्या नव्हत्या. परंतु, ऐन वेळेवर लग्नाची तयारी झाल्यामुळे अनू कोकाटे यांना घुईखेड येथे आणण्यात आले.