अमरावती : महाविद्यालयाची ऑनलाईन परीक्षा देण्यासाठी नजीकच्या गावी पायी निघालेल्या दोन बहिणींवर रानडुकराने हल्ला केला. ही घटना गुरुवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास मोर्शी तालुक्यातील बऱ्हाणपूर ते बेलोरा मार्गावर घडली. यात मोठी बहीण गंभीर झाली. तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. लहान बहिणीला किरकोळ जखमा आहेत. अश्विनी संजय काळे (२१, रा. बऱ्हाणपूर, ता. मोर्शी) असे गंभीर जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, अश्विनी संजय काळे (२१) ही विद्याभारती महाविद्यालयात बी.ए. द्वितीय वर्षाला, तर ज्ञानेश्वरी संजय काळे (२०) ही शासकीय तंत्रनिकेतनच्या तृतीय वर्षाला आहे. सकाळी १०.३० वाजता त्यांची ऑनलाईन प्रात्यक्षिक परीक्षा होती. गावात मोबाईलची रेंज नसल्याने त्या तीन किमी अंतरावरील बेलोरा येथील वाचनालय गाठण्यासाठी सकाळी ९.३० च्या सुमारास घरून निघाल्या. वाटेत या दोन्ही बहिणींवर रानडुकराने हल्ला केला. यात मोठी मुलगी अश्विनी ही गंभीर जखमी झाली. तिच्यावर बेलोरा येथे डॉ. बी.एल. तायडे यांनी प्राथमिक उपचार केला. त्यानंतर अमरावती येथे एका खासगी रुग्णालयात दोघींना दाखल करण्यात आले. येथे अश्विनीच्या यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तिच्या उजव्या पायाला १५ टाके लागले. आता तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वडील संजय रूपराव काळे यांनी ‘लोकमत’ला दिली.
-----------------
रानडुकराच्या हल्ल्यात जखमी अश्विनी हिच्या पायावर शस्त्रक्रिया योग्य प्रकारे करण्यात आली आहे. आता ती सुखरूप आहे. उजव्या पायाला १५ टाके लागले आहेत.
- डॉ. अभिजित देशमुख, एम.एस. सर्जन. अमरावती.
----------
बेताच्या परिस्थितीत आम्ही शिक्षण घेत आहोत. ताईच्या उपचारासाठी एकाच दिवशी १५ हजार खर्च झाले. आणखी काही दिवस दवाखान्यात राहावे लागेल. प्रशासनाने आम्हाला सानुग्रह मदत त्वरित द्यावी. - ज्ञानेश्वरी संजय काळे, बऱ्हाणपूर, ता. मोर्शी