अमरावती : मलाही चार वर्षांची मुलगी आहे. त्यामुळे अपहृत चिमुकल्याच्या कुटुंबीयांची, विशेषत: आईची मनोदशा काय झाली असेल, याची मला कल्पना आहे, असे उद्गार शहर पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी काढले. अपहरण प्रकरणातील चिमुकला व आरोपी यांना अमरावतीत आणल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या भावूक झाल्या होत्या.
नागपूर येथे घडलेल्या दोन अपहरणप्रकरणांमध्ये मुलांची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे शारदानगरातील या अपहृत चिमुकल्याच्या जिवाचे बरेवाईट तर होणार नाही ना, ही काळजी होती. यामुळे तपास गतिमान केला व मुलाला शोधण्यात पथकांनी यश मिळविले, असे आरती सिंह म्हणाल्या.
बॉक्स:
प्रत्येकी ५० हजारांचे बक्षीस
चिमुकल्याला शोधून काढणारे राजापेठ पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा, सायबर पोलीस तसेच अहमदनगर येथील गुन्हे शाखा व तपासात सहभागी इतर पोलीस कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५० हजारांचे बक्षीस पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी जाहीर केले. सदर फंड मिळण्याकरिता राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे पाठपुरावा करू, असे त्या म्हणाल्या.
बॉक्स:
आरोपींना २८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी
राजापेठ ठाण्यात भादंविचे कलम ३६२, ३४ अन्वये दाखल प्रकरणात कलम ३६४ अ, १२० ब या कलमा वाढविण्यात आल्या. अहमदनगरहून पाच आरोपी व अमरावती येथून एका महिलेला अटक करण्यात आली आहे. शनिवारी पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सर्व आरोपींना २८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
बॉक्स:
पोलीस पथक मास्टर माईंडच्या मागावर
अपहरण प्रकरणातील मास्टर माईंड इसार शेख ऊर्फ टकलू (रा. अहमदनगर) याच्याविरुद्ध तेथे २००५ ते २०१८ दरम्यान अपहरण, चोरी, घरफोडी सारखे तब्बल १९ गुन्हे दाखल आहेत. अहमदनगर गुन्हे शाखा व अमरावती पोलिसांचे पथक त्याच्या मागावर आहेत.
बॉक्स:
तपासामध्ये या अधिकाऱ्यांची मुख्य भूमिका
पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात उपआयुक्त शशिकांत सातव, सहायक आयुक्त ............ डुबरे यांच्या नेतृत्वात सदर तपास पूर्ण करण्यात आला. यामध्ये राजापेठचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे व पोलीस निरीक्षक किशोर शेळके तसेच राजापेठचे पोलीस पथक, शहर गुन्हे शाखेचे निरीक्षक कैशास पुंडकर यांचे पथक, वाहतुक शाखेचे प्रभारी सहायक आयुक्त किशोर सूर्यवंशी यांचे पथक, शहर सायबरचे सहायक निरीक्षक रवींद्र सहारे, सहायक निरीक्षक प्रशाली काळे, योगेश इंगळे, उपनिरीक्षक कृष्णा मोपारी, हेडकॉन्स्टेबल अशोक वाटाणे, राजेश पाटील, किशोर महाजन, अतुल संभे , विजय राऊत, दानिश शेख, राहुल ढेंगेकार, अमोल खंडेझोड, विनय मोहोड, नीलेश गुल्हाने, छोटेलाल यादव, दिनेश भिसे, सागर सरदार, नरेश मोहरील, पवन घोम, महिला पोलीस अंमलदार संगीता फुसे, मीरा उईके आदींचे तपासात सहकार्य लाभले.