संविधान दिन : कुलगुरू मोहन खेडकर यांचे प्रतिपादनअमरावती : २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना तयार करून ती देशाला समर्पित केली. या राज्यघटनेविषयी लोकांच्या मनात जागृती निर्माण व्हावी आणि तिचा आदर भारतीयांच्या मनामध्ये असावा, असे प्रतिपादन कुलगुरू मोहन खेडकर यांनी गुरूवारी येथे केले. येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात संविधान दिन कार्यक्रमात ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू जयकिरण तिडके, कुलसचिव अजय देशमुख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू व्ही.एस. सपकाळ, परीक्षा नियंत्रक जे.डी. वडते, वित्त व लेखाधिकारी शशीकांत आस्वले यांच्यासह विद्यापीठातील विविध विभागांचे विभाग प्रमुख, शिक्षक, अधिकारी व कमर्चारी बहुसंख्येने उपस्थित होते. पुढे बोलताना कुलगुरु खेडकर म्हणाले, २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. शासनाने देखील या दिनाचे औचित्य साधून संविधान दिन सर्वत्र साजरा करण्याबाबतचा शासन निर्णय घेतला आहे. देशाचे संविधान हे ग्रंथ म्हणून भारतीयांनी स्वीकार करणे काळाची गरज असल्याचे ते म्हणाले. देशाचे संविधानाने न्याय, समता, बंधुत्व प्रदान केले आहे. सामान्य माणसाला संविधानामुळे जगण्याचा अधिकार बहाल झाला आहे. शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२५ वी जयंती ही वर्षभर साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून संविधान दिन विद्यापिठात साजरा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्रात संविधान दिवस साजराविद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्रात संविधान दिवस साजरा करण्यात आला.यावेळी कुलगुरू मोहन खेडकर, प्र-कुलगुरू जयकिरण तिडके, कुलसचिव अजय देशमुख यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राज्यघटनेचे सुद्धा पूजन करण्यात आले. मुलनिवासी संघ महाराष्ट्र राज्य संघाचे अध्यक्ष निलिमा भटकर, राहुल देशमुख व जिल्हा संघटन सचिव राकेश चौरपगार यांनी यावेळी कुलगुरू मोहन खेडकर, प्र-कुलगुरू जयकिरण तिडके, कुलसचिव अजय देशमुख यांना संविधान उद्देशिकेची लॅमिनेटेड प्रत ससन्मान भेट दिली. याशिवाय विद्यापीठातील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभाग प्रमुख, कमर्चारी व विद्यार्थ्यांना उद्देशिकेची प्रत वितरीत करण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर केंद्राचे समन्वयक सचिन गायकवाड, समाजशास्त्र विभाग प्रमुख के.बी. नायक, किशोर राऊत, कायर्कारी अभियंता श्री शशीकांत रोडे जनसंपर्क अधिकारी विलास नांदुरकर, मुलनिवासी संघाचे प्रतिनिधी व विद्यार्थी उपस्थित होते.
राज्य घटनेविषयी लोकांच्या मनात जागृती निर्माण व्हावी
By admin | Published: November 27, 2015 12:25 AM