अमरावती : हल्ली कोरोनाचा हैदोस वाढत आहे. त्यामुळे संक्रमित रुग्ण, मृत्युसंख्या दरदिवशी रेकॉर्ड नोंदवित आहे. त्यामुळे कोविड-१९ च्या उपचारासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षक, कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी स्वंतत्र कोविड केंद्र निर्माण करावे, अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे.
जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी अविश्यांत पंड्या यांना दिलेल्या निवदेनानुसार, जिल्हा परिषदेचे शिक्षक, कर्मचारी व अधिकारी हे वेगवेगळ्या स्तरावर कर्तव्य बजावत आहेत. मात्र, अशावेळी एखाद्याला कोरोना संक्रमण झाल्यास त्यांना वैद्यकीय उपचारासह ऑक्सिजन व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. परंतु ऑक्सिजन व्हेंटिलेटरची पुरेशी सुविधा उपलब्ध न झाल्यामुळे बरेचशे शिक्षक व कर्मचारी कोविडमुळे मृत्युमुखी पडले आहे. परिणामी जिल्हा परिषदेने कोविड केंद्र स्थापन करावे, अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे.
कोविड सेंटर स्थापन करण्याकरिता आरोग्य विभाग जि.प. यांचे नियंत्रणात फक्त जिल्हा परिषद शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीयांवर उपचार करण्यासाठी जिल्हा परिषदेचे स्वतंत्र कोविड सेंटर निर्माण करण्यात यावे, ऑक्सिजन व्हेंटिलेटर व इतर साहित्य पुरेशा प्रमाणात खरेदी करण्यात यावे. सीईओ यांच्या अध्यक्षतेखाली पाच अधिकाऱ्यांची नियंत्रण समिती गठित करावी. यासाठी स्वतंत्र कोविड १९ उपचार कक्षाकरिता शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन कपात करावे आणि या ठिकाणी फक्त जि.प. शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांच्यावर उपचार करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे. शहरात अनेक शासकीय इमारती भौतिक सुविधांसह उपलब्ध आहेत. या ठिकाणी कोविड सेंटर स्थापन करता येईल.
जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षकांची आर्थिक मदत घेण्यात यावी. जि.प.ने हा स्तुत्य उपक्रम राबवावा, अशी मागणी शिक्षक समितीने केली आहे. ही मागणी मान्य करण्याची शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष गोकुलदास राऊत, जिल्हा सरचिटणीस संभाजी रेवाळे, कार्याध्यक्ष मनीष काळे, राज्य प्रसिध्दीप्रमुख राजेश सावरकर, महिला आघाडीप्रमुख सरिता काठोळे, सरचिटणीस योगिता जिरापुरे, कार्याध्यक्ष सुषमा वानखडे, कोषाध्यक्ष भावना ठाकरे,राज्य महीला प्रतिनिधी प्रविणा कोल्हे यांनी केली आहे.