जे.एन. आभाळे : जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवअमरावती : गुरु आणि शिष्य यांचे नाते अतुट असते. चागलं पेरलं तर चांगलंच उगवेल. विद्यार्थ्यात उर्जा शिक्षकच निर्माण करु शकतो. शिक्षणाने कुटूंब सुखी होईल. पण देशाचे रक्षण करण्यासाठी देशभक्त व सुदृढ पिढी निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यपालन अधिकारी जे.एन. आभाळे यांनी केले. ते मंगळवारी नांदगावपेठ येथे जिल्हास्तरीय प्राथमिक शालेय कला, क्रीडा व आनंद जत्रा महोत्सवाच्या कार्यक्रमाला संबोधित करताना बोलत होते. महोत्सवाचे उद्घाटन डेप्युटी सीईओ प्रकाश तट्टे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी डेप्युटी सीईओ (मनरेगा) माया वानखडे, प्राथमिक शिक्षण अधिकारी, श्रीराम पानझाडे, उपशिक्षणाधिकारी जयसिंग राऊत, बिडीओ भाऊसाहेब अकलाडे, निरंतर शिक्षणाधिकारी प्रदीप अभ्यंकर, माजी उपशिक्षणाधिकारी पंडित पंडागडे आदी उपस्थित होते. यावेळी पाहुण्याच्या हस्ते क्रीडाध्वजाचे ध्वजारोहण व क्रीडाज्योत प्रज्वलित करून क्रीडा महोत्सवास सुरूवात करण्यात आली. यावेळी धारणी पंचायत समिती येथील गोबरगहू शाळेची लेझिम कवायत, आष्टी, शिराळा, अंजनगांव सुर्जी, पथ्रोट येथील शाळांनी निदर्शने सादर केलीत. उद्घाटनीय कबड्डी सामना माध्यमिक मुलांच्या मोर्शी व भातकुली संघात घेण्यात आला.या महोत्सवात प्रथमच शिक्षण विभागाने विविध तालुक्यातील ज्ञानरचनावादी व ई-लर्निंग उपक्रमाचे सुमारे २० स्टॉल लावले. तसेच अखिल भारतीय शिक्षक संघाच्या वतीने रक्तदान शिबिर तसेच उर्दू शिक्षक संघटना व संघातर्फे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांनी केले.संचालन वैशाली ढाकुलकर, आभार प्रदर्शन जयश्री राऊत यांनी केले. सर्व पंचायत समितीमधून ४००० विद्यार्थी खेळाडू व शिक्षकवृंद उपस्थित होते. या तीन दिवसीय जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवामध्ये सांघिक स्पर्धा, वैयक्तिक स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याचे राजेश सावरकर यांनी सांगीतले आहे.
क्रीडा महोत्सवातून सुदृढ खेळाडू निर्माण करावे
By admin | Published: February 02, 2017 12:07 AM