अमरावती: भारतीय वन सेवेतील (आयएफएस) प्रशिक्षणार्थींसाठी राज्य संवर्गात अधिसंख्य पद निर्मिती केली जाणार आहे. त्यानुसार आयएफएसमधील महाराष्ट्र संवर्गातील सन २०२१-२०२३ च्या अभ्यासक्रमातील तीन परीविक्षाधिन अधिकारी चार महिन्यांचे व्यावसायिक प्रशिक्षणासाठी डेहराडून येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अकॅडमी प्रशिक्षण केंद्रातून येत आहे. या तीनही आयएफएस प्रशिक्षणार्थींसाठी अधिसंख्य पद निर्मिती करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाने ३ ऑगस्ट रोजी शासनादेश जारी केला आहे.
डेहराडून येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अकादमीचे अतिरिक्त संचालकांनी ३० जून २०२३ रोजी पाठविलेल्या पत्रानुसार आयएफएसचे तीन प्रशिक्षणार्थी हे महाराष्ट्र राज्य संवर्गात ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात येणार आहे. भावसे परीविक्षाधीन अधिकारी राज्यात रुजू झाल्यावर ७ ऑगस्ट ते २४ सप्टेंबर २०२३ यादरम्यान १६ आठवड्यांचे व्यावसायिक प्रशिक्षण राज्यात वनवृत्तामध्ये द्यावे लागणार आहे. या अधिकाऱ्यांच्या व्यावसायिक प्रशिक्षणाकरिता समन्वय राखण्यासाठी मार्गदर्शक म्हणून मुख्य वनसंरक्षक (शिक्षण व प्रशिक्षण, पुणे) एन. आर. प्रवीण यांची नेमणूक करण्यास मान्यता देण्यात आली आहे. नव्या आयएफएस प्रशिक्षणार्थींमध्ये पवनकुमार जोग (गडचिरोली, वडसा), सुहास चव्हाण (अमरावती) आणि योगेंद्र सिंह (नागपूर, गोंदिया) यांचा समावेश आहे. या तीनही अधिकाऱ्यांना निश्चित केलेल्या वनवृत्तात १६ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे.