अमरावती : शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जावर देण्याच्या दृष्टीने महाडीबीटीवर एकात्मिक संगणकीय प्रणाली तयार केली आहे. यात शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबी निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी शेतीशी निगडित विविध बाबींकरिता अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजनांतर्गत बियाणे या घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधांतर्गत लाभार्थ्यांनी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजनेतील सोयाबीन धान, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी इत्यादी अनुदानावर बियाणे उपलब्ध असून यासाठी १५ मेपर्यंत शेतकऱ्यांना अर्ज करता येईल. वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी त्याचा आधार क्रमांक पोर्टलवर नोंदणी करणे गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांकडे आधार नाही, त्यांनी प्रथम आधार नोंदणी करणे गरजेचे आहे. आधार क्रमांक महाडीबीटी पोर्टलमध्ये नोंदणी केल्याशिवाय अनुदानाचे वितरण होणार नसल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सदर योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.