फोटो -
बेनोडा (शहीद) : दोन वर्षांपासून सतत मागणी करूनही अमरावती-पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गावर बेनोडा येथे गतिरोधक बसविण्यात न आल्याने येथील उपसरपंच गोपाल नांदूरकर यांनी २५ जूनला बेमुदत उपोषणाला प्रारंभ केला होता. त्याचा धसका घेत महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने गतिरोधकाची निर्मिती करण्यात आली. यानंतर नांदूरकर यांनी उपोषण मागे घेतले.
राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक बसविण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून गावकऱ्यांनी विविध स्तरांवरून निवेदने दिली. या मार्गावर शहीद स्मृती विद्यालय, धामणधस फाटा, बस स्थानक, पोलीस ठाणे आदी ठिकाणी गतिरोधकाची मागणी ग्रामस्थांनी केली होती. या महामार्गावर शाळा, महाविद्यालये असल्याने शाळकरी विद्यार्थ्यांच्या जीविताला या महामार्गावरून धावणाऱ्या भरधाव वाहनांमुळे अपघाताची शक्यता आहे. धामणधस फाट्यावर यापूर्वी अनेक अपघात होऊन मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. या समस्येबाबत ग्रामस्थांनी अनेकदा कार्यकारी अभियंंत्यांना निवेदने दिली. विशेष म्हणजे, या महामार्गावरील अपघातात पादचारी वा दुचाकीचालकांचा जागीच मृत्यू झाला, हे विशेष.
अखेर बेनोडाचे उपसरपंच गोपाल नांदूरकर यांनी बसस्थानक परिसरात याकरिता बेमुदत उपोषण आरंभताच तिसऱ्याच दिवशी गतिरोधकाची निर्मिती सुरू करण्यात आली. कामाला सुरुवात होताच बेनोड्याचे ठाणेदार मिलिंद सरकटे यांच्या हस्ते लिंबूपाणी घेऊन नांदूरकर यांनी उपोषणाची सांगता केली. आंदोलनाला आलेले यश हे गावातील सर्व नागरिकांचे असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.