लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बीज प्रक्रिया व साठवणूक केंद्रातील अंकुर ३०२८ बीजी-२ या संकरीत कापूस वाणाच्या नमुन्यात तणनाशकाला सहनशील जनुकीय अंश आढळल्याप्रकरणी अंकुर सीड्स कंपनीविरूद्ध बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर ठाण्यात रविवारी गुन्हा नोंदविण्यात आला. विभागीय सहसंचालक कार्यालयातील तंत्र अधिकारी (गुणनियंत्रक) पंकज चेडे यांनी ही तक्रार दाखल केली. शेतकऱ्यांसह शासनाची फसवणूक व पर्यावरणाची हानी याप्रकरणी थेट बियाणे कंपनीच्या विरोधात गुन्हा नोंदविल्याची देशातील ही पहिलीच कारवाई असल्याचे गुणनियंत्रण विभागाने सांगितले.गतवर्षी बोंडअळीच्या प्रकोपामुळे कपाशीचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यामुळे यंदाच्या हंगामात चोरबीटी बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान व पर्यावरणाची हानी होऊ नये, यासाठी येथील गुणनियंत्रण विभागातर्फे विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये अंकुर कंपनीच्या मलकापूर येथील बीज प्रक्रिया व साठवणूक केंद्रातून १८ मे २०१८ रोजी एचटी जीन तपासणीकरिता संकरीत कापूस ३०२८- बीजी-२ या सत्यतादर्शक वाणाचा नमुना घेण्यात आला. व महाराष्ट्र बी-बियाणे नियम, २००९ तसेच पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ मधील कलम १० व ११ अन्वये केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरचे संचालकांकडे २५ मे रोजी तपासणीकरिता पाठविण्यात आला. या संस्थेचा अहवाल १९ जुलै २०१८ ला प्राप्त झाला. यामध्ये केंद्र शासनाच्या जनुकीय तंत्रज्ञान समितीने प्रतिबंध घातलेले तणनाशकास सहनशील जनुकीय अंश (एचटी जीन) ३० टक्के पॉझिटिव्ह आढळून आले.गुणनियंत्रण विभागाने हा अहवाल पुणे येथील कृषी आयुक्तांना पाठविला. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार रविवारी मलकापूर ठाण्यात अंकुर बियाणे कंपनीचे नागपूर येथील व्यवस्थापकीय संचालक व कंपनीचे मलकापूर येथील बी. चिरंजीव रेड्डी यांच्याविरुद्ध महाराष्ट्र कापूस बी-बियाणे अधिनियम २००९ चे कलम १३ व १५ तसेच पर्यावरण संरक्षक कायदा १९८६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे एचटी जीन?कपाशी बियाण्यात बोंडअळीला प्रतिबंधक असे बीटी जीन वापराला केंद्र शासनाच्या समितीची परवानगी आहे. मात्र, तणनाशकाला सहनशील असलेले जनुकीय अंश (एचटी जीन) वापरायला केंद्राच्या समितीची मनार्ई आहे. याच्या वापरामुळे जमिनीचा पोत खराब होतो व निसर्गातील जैवविविधता नष्ट होण्याची भीती आहे.अंकुर सीड्सच्या बीज प्रक्रिया व साठवणूक केंद्रातून चार सॅम्पल घेऊन नागपूरच्या सीसीआरआयकडे तपासणीला पाठविले. यामध्ये एचटी जीन ३० टक्के पॉझिटिव्ह आल्याने कृषी आयुक्तांच्या निर्देशावरून फिर्याद दाखल केली.- पंकज चेडे, तंत्र अधिकारी (गुणनियंत्रक)केंद्र शासनाने परवानगी नसलेल्या वाणाचे उत्पादन व विक्री केल्याप्रकरणी अंकुर सीड्स कंपनीविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आला व पर्यावरण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी परवाना अधिकारी म्हणून कंपनीला नोटीस बजावली.- सुभाष काटकर, मुख्य गुणनियंत्रक अधिकारी, पुणे