000000000000000000000000
चाकूची दहशत पसरविणार्या तरुणास अटक
अमरावती : दुचाकीवर फिरताना हातात चाकू घेऊन दहशत पसरविणार्या एका तरुणाला फ्रेजरपुरा पोलिसांनी यशोदानगरातील पेट्रोल पंपाबाजुच्या रॉयल मुक्त अपार्टमेंटसमोरून 22 डिसेंबर अटक केली. अभिषेक रमेश डिक्याव (20 रा. पोस्टमनकॉलनी) आणि शुभम सतिश सामरे (19 रा. आशाकॉलनी, दस्तुनगर) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिस उपनिरीक्षक अनिल मुळे पथकासह पेट्रोलिंग करीत असताना, त्यांना एका दुचाकीवर असणारे दोन तरुण हे हातात चाकू घेऊन गुन्ह्याच्या उद्देशाने फिरताना आढळून आले. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन दुचाकीसह चाकू असा एकुम 21 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणात पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुध्द 4/25 आर्मअॅक्ट, कलम 135 महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये गुन्हा नोंदविला.
000000000000000000000000000000
सार्वजनिक ठिकाणी गॅस सिलिंडरचा धोकादायक वापर
अमरावती : सार्वजनिक ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुरक्षीतता न ठेवता गॅस सिलिंडरचा धोकादायक वापर केल्यामुळे पोलिसांनी एका नास्ता स्टॉल चालकाविरुध्द गुन्हा नोंदविला. राजापेठ पोलिसांनी रविनगर परिसरात 22 डिसेंबर रोजी ही कारवाई केली. अमित सुधाकर काळे (31 रा. रविनगर) असे आरोपीचे नाव आहे. राजापेठ पोलिस पेट्रोलिंग करीत असताना, त्यांना रस्त्यावर काळे प्रतिष्ठान स्टॉलवर गॅस सिलिंडरचा धोकादायक वापर होताना आढळून आला. यावरून पोलिसांनी आरोपी अमित काळेविरुध्द भादंविच्या कलम 285 अन्वये गुन्हा नोंदविला.
00000000000000000000000
रॉयली प्लॉट परिसरातून तडिपाराला अटक
अमरावती : कोतवाली पोलिसांनी रॉयली प्लॉट परिसरातून एका तडिपार आरोपीला 22 डिसेंबर रोजी अटक केली. पंजाब कळसकर (30 रा. भटवाडी) असे आरोपीचे नाव आहे. कोतवाली पोलिस पेट्रोलिंग करीत असताना, त्यांना तडिपार आरोपी पंजाब कळसकर हा फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, तो विना परवानगी शहरात दाखल झाल्याचे आढळून आले. या आरोपीला दोन वर्षांकरिता जिल्हाबाहेर तडीपार करण्यात आले आहे. पोलिसांनी पंजाब कळसकरला ताब्यात घेऊन त्याच्याविरुध्द कलम 142 अन्वये गुन्हा नोंदविला.