अमरावती : नजीकच्या पिंपळखुटा अर्मळ येथे बालविवाहप्रकरणी २५ वर्षीय नवरदेवासह वधूचेही आई-वडील व उपस्थित ३० ते ४० वऱ्हाडींविरुद्ध फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्या पुढाकाराने ही कारवाई मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास करण्यात आली.
पोलीस सूत्रांनुसार, पिंपळखुटा अर्मळ येथे अल्पवयीन मुलीचा मंगळवारी विवाह लावण्यात येत असल्याची माहिती चाईल्ड लाईनच्या १०९८ या क्रमांकावर चाईल्ड लाईनचे सदस्य अजय देशमुख यांना १२ एप्रिल रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास अज्ञात व्यक्तीकडून प्राप्त झाली. या माहितीवरून जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले यांनी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या चाईल्ड लाईनचे अजय देशमुख व पंकज शिनगारे तसेच फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन मगर, उपनिरीक्षक प्रशांत जंगले, नायक पोलीस कॉन्स्टेबल अलका, कॉन्स्टेबल अमोल आखरे यांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता घटनास्थळ गाठले. यावेळी अल्पवयीन मुलीच्या घरापुढे मंडप टाकलेला होता. एक तासापूर्वी लग्न आटोपल्याचे पथकाला सांगण्यात आले. वधूने तिचे वय १७ वर्षे ३ महिने असल्याचे सांगितले. मुलगी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मुलीचे आई-वडील व एक ग्रामस्थ (तिन्ही रा. पिंपळखुटा अर्मळ), नवरदेव व त्याचे आई-वडील (रा. भडशिवणी, ता. कारंजा लाड, जि. वाशिम) व माळेगाव (जि. वाशिम) येथील एका व्यक्तीसह घटनास्थळी असलेल्या ३० ते ४० नागरिकांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ च्या ९, १०, ११ सह भादंविचे कलम १८८, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रसंगी बालविवाह प्रतिबंधक अधिनियमाबाबत दोन्ही पक्षांचे प्रबोधन करण्यात आले.