अमरावती : जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांच्या पदाला शासनाने एक वर्षाची मुदतवाढ दिल्यामुळे त्यांचे सहकारी व समर्थकांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले. तेथे ढोल-ताशे वाजवून व फटाके फोडून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लघंन केल्याप्रकरणी निकम यांच्यासह तिघांविरुद्ध शहर कोतवाली पोलिसांनी कलम १८८ व अन्य कलमान्वये गुरुवारी गुन्हा नोंदविला.
जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, सुपर स्पेशालिटी कोविड रुग्णालयातील व्यवस्थापक डॉ. रूपेश खडसे, सुपरवायझर गजानन खंडारे यांच्याविरुद्ध भादंविचे कलम १८८, ५१ (ब) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा नोंदविला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महानगर अध्यक्ष संतोष बद्रे (४२, रा. बुधवारा) यांनी सिटी कोतवाली ठाण्यात तक्रार नोंदविली होती. कोविड असतानाही डॉ. रूपेश खडसे, व गजानन खंडारे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले तसेच जबाबदार अधिकारी असलेले जिल्हा शल्यचिकित्सक या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. या ठिकाणी जिल्हा सामान्य रुग्णालयातील २० ते २५ जण होते. येथे ढोल-ताशे वाजविण्यात आले तसेच फटाके फोडण्यात आले. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हे करीत असताना शारीरिक अंतर ठेवले नाही तसेच शासनाच्या नियमांचे उल्लघंन केल्याचा आरोपी तक्रारीत करण्यात आला आहे. पुढील तपास सिटी कोतवाली पोलीस करीत आहेत.