अमरावती : येथील एका बँकेत कार्यरत कर्मचारी महिलेला जाणूनबुजून स्पर्श करून, तिचा पाठलाग करून विनयभंग करण्यात आला. २२ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत आरोपीने आपली अनेकदा छेड काढल्याची तक्रार त्या महिलेने १९ मार्च रोजी शहर कोतवाली पोलिसांत नोंदविली आहे. याप्रकरणी मो. अब्दुल्ला (२९, रा. माता लाईन, छायानगर, अमरावती) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, आरोपी हा अकारण बँकेत येतो. तक्रारकर्त्या महिलेसह तेथील अन्य महिलांना न्याहाळतो. २२ फेब्रुवारी रोजी रक्कम काढण्याच्या बहाण्याने त्याने तिचा विनयभंग केला. आरोपी हा तिच्यावर नेहमीच लक्ष ठेवून असतो. एवढेच काय तर तो पार्किंगमध्ये उभा राहून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्नदेखील करतो. त्यामुळे ही बाब महिलेने तिच्या पतीला सांगितली. पतीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता, त्याने त्यांनाच मारहाण केली. आरोपी तेवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने महिलेच्या पतीला पाहून घेण्याची धमकीदेखील दिली. त्याचवेळी माझ्याशी बोल, अन्यथा ठार मारण्याची धमकी त्याने आपल्याला दिल्याचे महिलेने म्हटले आहे. बँकेतील मुख्य रोखपालाने त्याच्यावर लक्ष ठेवले असता, त्याने त्यांनादेखील जीवे मारण्याची धमकी दिली.
फेसबुकवर मेसेज
महिलेसह तिच्या पतीला व रोखपालाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. आरोपी मोहम्मद अब्दुल्ला याने महिलेसह तेथील व्यवस्थापक व लिपिकाच्या फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मेसेंजरद्वारे मेसेज पाठवून बोलण्याचा प्रयत्नदेखील केला. त्यामुळे महिला हवालदिल झाली. तिने १९ मार्च रोजी दुपारी शहर कोतवाली पोलीस ठाणे गाठले. त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक सुदाम आसोरे तपास करीत आहेत.