अमरावती : तिचा गर्भपात व्हावा यासाठी पतीसह सासरच्या अन्य मंडळीने अनन्वित छळ केला. हाकलून दिले. त्या असह्य त्रासादरम्यान तिने मुलीला जन्म दिला. मात्र, ती नवजात मुलगी ‘नकोशी’ ठरली. त्या छळमालिकेत भरच पडली. अखेर तिने पोलीस आयुक्तालयात धाव घेतली. तेथेही समेट घडून आला नाही. अखेर तिच्या तक्रारीवरून पतीसह सासरकडील मंडळीला फौजदारी गुन्ह्याला सामोरे जावे लागले.
शहरातील एका वसाहतीत सासर असलेल्या त्या विवाहितेला अगदी लग्नापासून सासरचा असह्य जाच सहन करावा लागला. याप्रकरणी २२ ऑगस्ट रोजी बडनेरा पोलिसांनी तिचा पती मोहसिन खान (३१), मंजूर अहमद खान (६०), अब्दुल हमीद (४५, रा. वलगाव रोड) व तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यातील फिर्यादी व मोहसीन खान हे पती पत्नी असून, त्यांचे जून २०१९ मध्ये बडनेरा येथे लग्न झाले. अपेक्षेप्रमाणे हुंडा न दिल्याच्या कारणावरून सासरच्यांनी तिला लग्न झाल्यापासून शारीरिक व मानसिक त्रास देणे सुरू केले. आईवडिलांकडून दुचाकी आणण्यास नकार दिल्याने मोहसीनने तिला मारहाण केली. सन २०२० मध्ये तिच्या कमरेवर जोरात लाथ मारली. तिला घरातून हाकलून दिले.
ट्रक घेण्याकरिता मागितली रक्कम
तक्रारकर्ती विवाहिता गरोदर झाल्यानंतर सासरच्या मंडळीने अपत्य नको, म्हणून तिच्यावर गर्भपातासाठी दबाव टाकण्यात आला. गरोदरपणाच्या कालावधीत तिच्या औषधोपचाराकडेदेखील दुर्लक्ष करून गर्भपात व्हावा, याकरिता तिच्याकडून घराची कामे करून घेतली. सन २०२२ मध्ये मोहसीनने ट्रक घेण्याकरिता तिला माहेरहून ५ लाख रुपये आणायला सांगितले. ते आणण्यास नकार दिल्याने तिला मारहाण करण्यात आली. दरम्यान, प्रसूतीनंतर मुलगी झाल्याच्या कारणावरून तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला.