अमरावती : गाडीसाठी तुझ्या बाबाकडून पैसे घेऊन ये, असा तगादा लावत सासरच्या मंडळीने आपला अनन्वित शारीरिक व मानसिक छळ चालविल्याची तक्रार एका विवाहितेने नोंदविली. २४ मे रोजी दुपारी नोंदविलेल्या तक्रारीनुसार, अंजनगाव सुर्जी पोलिसांनी सुमित देशमुख (रा. शेंदुरजना खुर्द, ता. धामणगाव रेल्वे), शामराव हरणे, एक महिला (दोघेही रा. हिंगणी गावंडगाव) व बबनराव (रा. कोल्हा काकडा) यांच्याविरूद्ध कौटुंबिक छळ, मारहाण व शिविगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारीनुसार, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील एका २७ वर्षीय विवाहितेचे सन २०१९ मध्ये सुमित देशमुख याच्याशी लग्न झाले. लग्नानंतरचे काही दिवस आनंदात गेल्यानंतर सुमितने तिला छळ सुरू केला. माहेरवरून पैसे आणण्याचा तगादा लावत तुझ्या माहेरच्या लोकांनी आंदणांमध्ये चांगल्या भेटवस्तू दिल्या नाहीत, मला गाडी पाहिजे होती, आता गाडीसाठी तुझ्या बाबांकडून पैसे घेऊन ये, असे म्हणून तिला शारीरिक व मानसिक त्रास देणे सुरू केले.
आरोपी शामराव हरणे व एक महिलेने सुमित देशमुखला फिर्यादी विवाहितेच्या माहेरचा हिस्सा मागण्याबाबत भडकावले. तो दिला तर ठिक, नाहीतर तिला सोडून दे, असे म्हणून ते आपल्या पतीला भडकावतात, असे देखील पिडित विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे.
संसारात नाहक हस्तक्षेप
बबनराव नामक नातेवाईकाने तुझ्या पत्नीला माहेरवरून पैसे आणायला लाव व तुझे कर्ज फेडून टाक, असे सांगत आपल्या संसारात हस्तक्षेप चालविला आहे. ते पतीला भडकवून देतात. तथा शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक त्रास देतात, अशी तक्रार त्या २७ वर्षीय विवाहितेने नोंदविली आहे. २० जून २०२१ ते १३ मे २०२३ पर्यंत ती छळमालिका चालल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.