अमरावती : नवरा गळ्याभोवती फास आवळणार, इतक्यात तिने त्याच्या हाताला जोरदार हिसका दिला. त्याला दूर लोटले. जिवाच्या आकांताने ती घराबाहेर पळाली अन् तिने सुटकेचा श्वास घेत रात्र शेजारी काढली. दुसऱ्या दिवशी माहेर गाठले. १ जून रोजी रात्री १०च्या सुमारास धामणगाव रेल्वे तालुक्यातील झाडा येथे घटना घडली.
याप्रकरणी त्या विवाहितेच्या तक्रारीवरून मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी आरोपी नीलेश खडसे (३५), अंकुश खडसे (२८), रोशन खडसे (२८) व तीन महिला (सर्व रा. झाडा) यांच्याविरुद्ध कौटुंबिक छळ, मारहाण व हुंडा प्रतिबंधक कायद्यातील कलम ४ नुसार गुन्हा दाखल केला. याप्रकरणी १८ ऑक्टोबर रोजी दुपारी गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
यापूर्वीदेखील पतीने मारहाण करून रात्रीच्या वेळी बाहेर काढून दिले. त्यामुळे त्या विवाहितेला रात्र बाहेर काढावी लागली. त्यानंतर अनेकदा तिचा अनन्वित छळ करण्यात आला. माहेरहून पैेसे आण, तरच घरात ये, अशी धमकी देत तिला माहेरी जाण्यास, पैसे आणण्यास बाध्य करण्यात आले. त्यामुळे माहेराहून २० हजार रुपये आणून तिने पतीला दिले. पैसे आणल्याने काही दिवस त्रास थांबला. मात्र काही महिन्यातच ती छळमालिका पुन्हा सुरू झाली. तिला मारहाण करणे सुरू झाले.
'ती' काळरात्र
१ जून रोजी रात्री १०च्या सुमारास ती विवाहिता सासरी झाडा येथे असताना आरोपी पती नीलेश खडसे हा अचानक पत्नीच्या अंगावर चाल करून आला. काही समजण्याच्या आत त्याने तिला फाशी देऊन मारण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत ती त्याच्या कचाट्यातून सुटली. हाताला झटका देत घराबाहेर पळाली. रात्रभर तिने शेजारी महिलेकडे काढली. दुसऱ्या दिवशी सकाळीच तिने माहेर असलेले अंजनगाव सुर्जी शहर गाठले. नवरा काहीही करू शकतो, या भीतीपोटी ती चार महिने तक्रारीसाठी मागेपुढे करीत राहिली. अखेर आपण कधीपर्यंत मरण अनुभवणार आहोत, एक दिवस निर्णय घ्यावाच लागेल, अशी ठोस भूमिका घेऊन तिने १८ ऑक्टोबर रोजी मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाणे गाठले.