अमरावती : गुन्हेगारीचे स्वरूप बदलले असून यात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. परिणामी, राज्यातील कारागृहे ही सुधारणा व पुनर्वसन हे नव्हे तर आता गुन्हेगारांचे हब म्हणून नावारूपास येत आहे, तसेच देश-विदेशातील बंदिस्त कैद्यांमुळे कारागृहे ही हाऊसफुल झाली असून राज्यात ६० कारागृहांमध्ये ४० हजार ४२८ कैदी बंदिस्त आहेत. अधिकृत बंदीक्षमतेपेक्षा १३ हजार ३१८ कैदी जास्त ठेवण्यात आले आहेत.
कारागृहांत निम्म्या मनुष्यबळावर क्षमतेपेक्षा दुप्पट कैद्यांचा भार आला आहे. त्यामुळे कारागृहांची अंतर्गत व बाहेरील सुरक्षा भेदत मोठे गुन्हे घडत आहेत. हे चित्र संपूर्ण राज्यातील कारागृहांमध्ये असून क्षमतेपेक्षा दुप्पट बंदीवान आहेत. राज्यभरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्यामुळे आता कारागृहात बंदी ठेवायला अडचणी येत असल्याचे वास्तव आहे. कैदीसंख्या जास्त आणि मनुष्यबळ कमी ही नित्याचीच बाब झाली आहे. त्यामुळे अनेक कारागृहांमध्ये होमगार्डची सुरक्षेसाठी मदत घेण्यात येत आहे. विशेषत: शिपाई पदाची कमतरता ही कारागृह अधीक्षकांसमोर मोठी समस्या उद्भवत आहे. मुंबई, येरवडा, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहात देश-विदेशातील गंभीर गुन्ह्याचे आरोपी बंदिस्त असल्याने तोकड्या मनुष्यबळामुळे अंतर्गत व बाह्य सुरक्षेचा मोठा ताण यंत्रणेवर येत असल्याचे वास्तव आहे.
बंदीप्रकारावर एक नजर...- बंदीक्षमता : २७ हजार ११०- प्रत्यक्षात बंदिस्त कैदी : ४० हजार ४२८- सिद्धदोष : ७४७७ (पुरुष : ७१७०, स्त्री : ३०६, तृतीयपंथी : १)- न्यायाधीन : ३२४५३ (पुरुष : ३१०८६, स्त्री : १३५१, तृतीयपंथी : १६)- स्थानबद्ध व इतर : ४८९
"कारागृहात बंदीजनांची गर्दी वाढली हे वास्तव आहे. नव्याने १० ते १२ कारागृहांच्या निर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. खुले कारागृहांच्या क्षमता वाढीमुळे गर्दी कमी करण्यात येत आहे, तसेच केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत गरीब कैद्यांना न्यायालयीन मदतीद्वारे कारागृहातून बाहेर पाठविण्यात येत आहे. गत वर्षभरात १८९७ कैदी खुले कारागृहात पाठविले आहेत."- डॉ. जालिंदर सुपेकर, प्रभारी तुरुंग महानिरीक्षक, महाराष्ट्र